हरिपाठ व मनाचे श्लोक यांतील साम्यस्थळे
ह.भ.प. दीपक हनुमंत जेवणे (कीर्तन विशारद)
अनेकदा दोन महापुरुष वा दोन विचारवंत यांच्या विचारातील भेद
आणि साम्यस्थळे दर्शविण्याचा प्रयास विचारवंत करीत असतात. यामधील दोन महापुरुष हे वेगळया
संस्कृतीतून, समाजातून, विचारधारांमधून आलेले असले तर त्याला वेगळा
आशय प्राप्त होत असतो. वाचकांनाही अशी तुलना आवडत असते वा पसंत पडत असते. विचारांतील
भेद सामान्य वाचकांनाही प्रकर्षाने जाणवू शकतो; मात्र साम्यस्थळे
पाहण्यासाठी दोन्ही महापुरुषांच्या विचारधारांचा समग्र अभ्यास आवश्यक असतो. एखादा अभ्यासक
वा संशोधक अशी तुलना करू शकतो. वेगळया संस्कृतीतून आलेल्या महापुरुषांच्या विचारसरणीतील
साम्यस्थळे वाचकांना विस्मित करून जातात. पण काही वेळा एकाच संस्कृतीतील महापुरुषांच्या
विचारांतील साम्यस्थळे दर्शविण्याचाही प्रयास केला जातो. संस्कृती एकच असली तरी तिच्यात
वेगवेगळी दर्शने आकाराला येऊ शकतात हे नाकारता येत नाही. भारतीय संस्कृतीत अशी मोठी
विविधता आपल्याला आढळून येते. काही अभ्यासक अशा विविधतेत एकता शोधत असतात. मात्र एका
विचारधारेच्या अनुयायांचा दुसऱ्या विचारधारेतील महापुरुषाच्या साहित्याचा पुरेसा अभ्यास
नसल्यास अज्ञानातून सदर विचारधारेस वेगळे मानले जाणण्याचा धोका नाकारता येत नाही.
मात्र तुलनात्मक दृष्टीने विचार करताना 'एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति मे।' या सूत्रानुसार आध्यात्मिक ज्ञानाचे उगमस्थान कदाचित एकच असावे, असे वाटते. याच विचाराला पुढे नेऊन आपण असे म्हणू शकतो की, जर प्रारंभिक सूत्र एकच असेल तर मग त्याचे प्रकटिकरण जर वेगवेगळया व्यक्तींने
वेगवेगळया काळात आणि प्रसंगात वेगळेपणाने केले असले तरीही त्यातील एकत्व मोडत नाही
अथवा पुन्हा एकत्व प्रस्थापित करण्याचा प्रयास म्हणजे अकारण खटाटोप या सदरातही मोडणारा
ठरू शकतो.
भारतीय संस्कृतीत वेगवेगळया उपासना पंथांनी मांडलेले तत्त्वज्ञान वरकरणी वेगळे
भासत असले तरी तसे ते वेगळे नसतेच, त्यामुळे त्यातील साम्य प्रत्ययाला आल्यावर
वाटणारा विस्मय अनाठायी का म्हणता येणार नाही!
या लेखाची अशी प्रस्तावना करण्याचे कारण हेच की संत ज्ञानदेवांचा हरिपाठ आणि संत
रामदास यांचे मनाचे श्लोक यांच्यातील साम्यस्थळे दाखविण्याचे साहस येथे लेखकाला करायचे
आहे. एका टप्प्यावर या दोन्ही महापुरुषांनी मांडलेले विचार इतके एकरूप होतात की, त्यात वेगळेपणाच
भाव हा मिथ्या ठरावा!
काळाच्या ओघात सुरूवातीला या ज्ञानाचा पूर्वापार मौखिक पध्दतीने प्रसार झाला. तसा
प्रकार होताना स्वाभाविकपणे व्यक्तिसापेक्ष पध्दतीने त्यात काही आणखी जोडले गेले अथवा
काही वगळले गेले असावे. काही गोष्टी नव्या प्रकारे मांडण्यात आल्या असाव्यात पण गुरुशिष्य
परंपरेने हे ज्ञान पुढे पुढे चालत गेले. आपल्या सनातन धर्मात परमात्मा हा निराकारच
मानला गेला आहे. सगुण भक्तीच्या मिषाने त्याला विविध आकारात आणि विविध स्वरूपात कल्पिले
गेले. तसेच या परमात्म्याला वेगवेगळी नावेही ठेवण्यात आली. काही नावे पुल्लिंगी तर
काही नावे स्त्रिलिंगी असली तरीही हा परमात्मा निर्गुण व निराकार असल्यामुळे त्याला
अमुक एक लिंग धारण करणारा असे मानता येत नाही. त्याला नर वा नारी मानता येत नाही. सगुण
भक्ती करणारे पंथ तयार झाल्यानंतर त्यांची दैवतभेदाने वेगळी ओळख निर्माण झाली. पण हा
परमात्मा अभेद तत्त्वानेच नटलेला आहे. त्यामुळे प्रसंगवशात् नाम वा रूप तसेच वेगळे
संबोधन वापरल्याने त्याच्या तत्त्वाला कोणतीही बाधा निर्माण होत नाही. पंथ आणि संप्रदायांत
वेगळी ओळख व वेगळेपणा असला तरी मूळ अध्यात्म आणि उपदेशात वेगळेपणा असू शकत नाही. वारकरीपंथात
'रामकृष्णहरी'
हा मंत्रच बनला आहे आणि रामदासांनीही समर्थ संप्रदायात या तिन्ही नामांत
अभेद मानून प्रसंगवशात रामनामासोबत अन्य नामांचाही वापर केलेला आहे. प्रस्तुत लेखात
वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वर आणि समर्थ संप्रदायाचे संस्थापक रामदास स्वामी
यांच्या उपदेशातील सारखेपणा अथवा साम्य दर्शविले आहे. खरे पाहता, या दोनच संप्रदायात हे साम्य नसून अन्य संप्रदायांतही अंतिमतः असेच साम्य आढळून
येईल, असा लेखकाचा कयास आहे. प्रसंगोपात वेगळे शब्द वापरले गेले
तरी त्यातून एकच भावार्थ निघतो, असे आमचे विनम्र निवेदन आहे.
माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि समर्थ रामदास स्वामी या दोन संतांच्या काळातही मोठे
अंतर आहे. हे दोन्ही संत वैराग्यपूर्ण होते हे मोठे साम्य. वास्तविक पाहता, ज्ञानेश्वर महाराजांच्या
जन्मसालाबाबत वाद आहे. शालिवाहन शके 1193 अथवा 1197 मध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदी येथे जन्म झाला. रामदास स्वामी यांचा जन्म
शके 1530 साली जांब येथे झाला. याचा अर्थ या दोन्ही संतांच्या
कार्यकाळात चारशे वर्षांहून अधिक अंतर होते. आणखी महत्त्वाचा भेद म्हणजे ज्ञानेश्वरांच्या
काळी स्वराज्य होते तर रामदासांचे काळी पारतंत्र्य होते आणि याच पारतंत्र्यात छत्रपती
शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळी
देवगिरीचे यादवांचे हिंदवी स्वराज्य आणि रामदासांच्या काळी शिवरायांचे हिंदवी स्वराज्य
होते या साम्यतेपर्यंत आपण पोहोचू शकतो. मात्र धर्मसंस्थापनेचे कार्य दोन्ही संतांना
करावे लागले. बहुजन समाजाला वेदविद्येची द्वारे उघडून देण्यासाठी ज्ञानेश्वरांनी 'भावार्थदिपिका' ही गीतेवरील टीका मराठी भाषेत लिहिली
आणि समर्थांनीही मराठी भाषेत अध्यात्मविद्या आणण्यासाठी 'दासबोध'
ग्रंथ लिहिला.
आणखी महत्त्वाचे साम्य सांगायचे तर, भाविकांसाठी ज्ञानेश्वरांनी विस्ताराने सोपासुलभ
असा 'हरिपाठ' लिहिला तर समर्थ रामदासांनी
सोपेसुलभ असे 'मनाचे श्लोक' लिहिले. एवढा
काळ लोटला तरी हरिपाठाची आणि मनाच्या श्लोकांची लोकप्रियता न घटता वाढतच जात आहे. हरिपाठाचा
एखादा अभंग माहीत नाही अथवा मनाच्या श्लोकांतील एकही श्लोक माहीत नाही, असा मराठी मनुष्य मिळणे दुर्लभच! केवळ तुलनात्मक दृष्टया सांगायचे तर कालानुक्रमे
मनाचे श्लोक हे आपल्याला अधिक निकटच्या काळात रचले गेलेले असल्यामुळे त्यातील मराठी
भाषा आपणास समजायला अधिक सुलभ वाटते. हरिपाठाची रचना त्यापेक्षा जुन्या काळात झालेली
असल्यामुळे त्याचा भावार्थ प्रयत्न करून समजून घ्यावा लागतो. परंतु या विवेचनाचा असा
मुळीच अर्थ होत नाही की, हरिपाठापेक्षा मनाच्या श्लोकात कमी अध्यात्म
आले आहे वा मनाच्या श्लोकांपेक्षा हरिपाठात उच्च दर्जाचे अध्यात्म आले आहे. यापेक्षा,
अतिशयोक्ती वाटली तरी असे म्हणायला हरकत नाही की, माऊलींनीच रामदासांच्या रूपाने पुन्हा प्रकट होऊन हरिपाठातीलच अध्यात्म अधिक
सुलभ आधुनिक मराठीत मनाच्या श्लोकांच्या रूपाने मांडले आहे. या लेखात अशी समानता दर्शविणारे
मनाचे श्लोक व हरिपाठाच्या अभंगातील चरण दिलेले आहेत. अभ्यासकांनी यावर अवश्य विचार
करावा!
'गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा।' हा पहिला नमनपर
श्लोक झाल्यावर, समर्थ रामदास मनाच्या श्लोकाचा सूत्रपात करताना
दुसऱ्याच श्लोकात सांगतात -
मना सज्जना भक्तिपंथेचि जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥
हा पंथ राघवाचा आहे असे उल्लेख केल्यानंतरही समर्थ असेच सांगतात की, तो श्रीहरी आपल्याला
पावायचा असेल तर आपण भक्तिमार्गानेच वाटचाल केली पाहिजे. मनाच्या श्लोकात हरिनामाची
आवर्तने होतात, तर माउलींच्या हरिपाठात 'रामकृष्ण' नामाचा गौरव सतत सांगितला जातो. माउली ज्ञानेश्वर
महाराज हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात सांगतात -
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
तेणे मुक्ती चारी साधियेल्या ॥ 1 ॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥ 2 ॥
असोनि संसारी जिव्हे वेगु करी ।
वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ॥ 3 ॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे ।
द्वारकेचा राणा पांडवा घरी ॥ 4 ॥
नेमका हाच अर्थ स्पष्ट करताना समर्थ रामदास मनाच्या श्लोकात सांगतात -
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।
पुढे वैखरी राम आधी वदावा ॥ 3 ॥
न ये राम वाणी तया थोर हाणी ।
जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी ॥
हरीनाम हे वेदशास्त्री पुराणी ।
बहु आगळे बोलिली व्यासवाणी ॥ 90 ॥
मुखी नाम नाही तया मुक्ती कैची ।
अहंतागुणे यातना ते फुकाची ॥
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा ।
म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ॥ 97 ॥
देहादीक प्रपंच हा चिंतियेला ।
परी अंतरी लोभ निश्चित ठेला ॥
हरीचिंतने मुक्तिकांता वरावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ॥ 165 ॥
तसे पाहता, हरिपाठाचे 27 अभंगच सांप्रदायिक मान्यतेप्रमाणे
गाइले जातात; त्याच ठिकाणी मनाच्या श्लोकांची संख्या 205
आहे. त्यामुळे माउलींच्या हरिपाठ सूत्ररूपाने आलेल्या सिध्दान्ताबाबतचीच खुलासेवार रचना मनाच्या श्लोकात आलेली आहे व समर्थांनी
आपली कल्पना अत्यंत विस्तारपूर्वक मांडलेली आहे.
या दोन्ही संतांच्या प्रतिपादनात साम्य पाहायला गेलो तर आपणास आढळते की, दोन्ही संत 'व्यास'वाणीचा दाखला देतात, वेदशास्त्रांची
ग्वाहीसुध्दा देतात. माउली 'हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा' असे सांगतात तर समर्थ 'म्हणा रे म्हणा देवराणा' असे सांगतात. नामस्मरणाने चारी मुक्ती साधल्या जातात असे माऊली सांगतात;
त्याच ठिकाणी समर्थ आग्रह धरतात की, 'हरीचिंतने
मुक्तिकांता वरावी ।' यावर आणखी भाष्य काय करावे?
पुढे समर्थ सांगतात -
न बोले मना राघवेवीण काही ।
जनी वाऊगे बोलता सुख नाही ॥ 23 ॥
माऊली सांगतात -
अनंत वाचाळ बरळती बरळ ।
त्या कैसा दयाळ पावेल हरि ॥ 3.7 ॥
मानवाचा जन्म हा हरिनामसंकीर्तनासाठीच झालेला असल्यामुळे भगवंताचे नामस्मरण करताना
एक घडीसुध्दा फुकट जाऊ देऊ नकोस, असे पुढे समर्थ सांगतात -
मना जे घडी राघवेवीण गेली ।
जनी आपुली ते तुवा हानी केली ॥ 46 ॥
याच संदर्भात, हरिच्या नामाशिवाय संपूर्ण जग हे मिथ्या आणि मायारूप असल्यामुळेच
हरिनाम घेतल्यावाचून तू अर्धघडी राहू नकोस असे माऊली सांगतात -
सर्व सुख गोडी सर्व शास्त्रे निवडी ।
रिकामा अर्धघडी राहू नको ॥ 1 ॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार ।
वाया येरझार हरिविण ॥ 2.27 ॥
संत तुलसीदास सुध्दा या अर्धघडीच्याही अर्ध्या भागाचे महात्म्य आपल्या दोह्यात
सांगतात -
एक घडी आधी घडी आधी मेंपुनि आध ।
तुलसी संगत साधु की कटे कोटि अपराध ॥
एकूण 'हरिभजनाविण
काळ घालवू नको रे' असेच या संतांना सांगायचे आहे!
हरिनामाची गोडी लागलेला हरीचा भक्त सर्वत्र एकाच हरीला पाहत असतो, हे सांगताना समर्थ
म्हणतात -
मनी लोचनी श्रीहरी तोचि पाहे ।
जनी जाणता भक्त होऊनि राहे ॥ 47 ॥
तशाच प्रकारे माउली सांगतात -
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ।
भरला घनदाट हरि दिसे ॥ 4.2 ॥
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी ।
हरि दिसे जनी वनी आत्मतत्त्वी ॥ 4.6 ॥
समर्थ आपल्या मनाच्या श्लोकात एके ठिकाणी सांगतात-
वसे हृदयी देव तो जाण ऐसा ।
नभाचे परी व्यापकु जाण तैसा ।
सदा चंचला येत ना जात काही ।
तयावीण कोठे रिता ठाव नाही ॥ 195 ॥
आता, पाहा बरे
यांच्या प्रतिपादनात किती साम्य आहे! माउली सांगतात की, भरला
घनदाट हरी दिसे आणि समर्थ सांगतात की, तयाविण कोठे रिता ठाव नाही.
जनी वनी आत्मतत्त्वी हरी दिसतो असे माउली सांगतात; समर्थ तेच
प्रतिपादन करताना म्हणतात -
मनी लोचनी श्रीहरी तोचि पाहे ।
जनी जाणता भक्त होऊनि राहे ॥ 47 ॥
म्हणजे, पाहा पुन्हा
फिरून आलोच की नाही तेथे!
समर्थ पुढे सांगतात -
समस्तामध्ये सार साचार आहे ।
कळेना तरी सर्व शोधूनी पाहे ॥
जीवा संशयो वाउगा तो त्यजावा ।
प्रभाते मनी राम चिंतित जावा ॥ 75 ॥
माऊली काय सांगतात ते पाहा बरे -
मंथुनी नवनीता तैसे घे अनंता ।
वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥ 2.2 ॥
त्रिगुण असार निर्गुण हे सार ।
सारासार विचार हरिपाठ ॥ 1 ॥
सगुण निर्गुण गुणाचे अगुण ।
हरिविण मन व्यर्थ जाय ॥ 2.3 ॥
अहो, सार म्हणजेच
नवनीत. या गुणमयी विश्वात सार असेल तो केवळ हरीच, अन्य सर्व काही
असार आहे. लोणी मिळविण्यासाठी मंथन तर करावेच लागते आणि हरी मिळविण्यासाठी समर्थ विचाराने
शोध घ्या म्हणतात. हे सर्व विचारमंथनच आहे की! व्यर्थ असलेला संशय सोडून द्यावा याबाबत
दोन्ही संतांचे एकमत आहे.
पूर्वार्ध समाप्त
No comments:
Post a Comment