गायन आणि कीर्तन
संगीत म्हणजे गायन आणि कीर्तन
यांच्यातील एक वेगळाच संबंध परवा उमगला. राग गाताना स्वरविस्तार अथवा आलाप करण्याची
पध्दत आहे. वेगवेगळया पुस्तकातून एकाच रागाचे स्वरविस्तार व आलाप वेगवेगळे दिलेले असतात.
विद्यार्थ्याने नेमका कोणता स्वरविस्तार अथवा आलाप पाठ करावा? हा प्रश्न पडला.
याचे उत्तर असे की, स्वरविस्तार अथवा आलाप पाठ कशाला करावा. पाठ
केलेले आलाप घेण्याची सवय लागल्यास गायन ठोकळेबाज बनते व त्यात जिवंतपणा उरत नाही.
एकदा राग आणि त्यातील स्वर कळले, स्वरसंगती कळली आणि अलंकारांचा
अभ्यास चांगला जमलेला असला तर मग उत्स्फूर्त आलाप घेता येतात. गायनात जिवंतपणा येतो.
कीर्तनाचेही तसेच आहे. वेगवेगळे
अभंग, श्लोक,
आर्या, ओव्या यांचे पाठांतर यासाठीच करावे लागते.
पण सेवेला घेतलेल्या अभंगाचा जेव्हा विस्तार करायचा असतो तेव्हा तो ठोकळेबाजपणे केल्यास
त्यात जिवंतपणा उरत नाही. जिवंतपणा म्हणजे श्रोत्यांशी संवाद होय. कीर्तनाची मांडणी
कशी करावी याचे पाठांतर केले जाते. पण आयत्यावेळी कीर्तन चालू असताना श्रोत्यांना काय
रुचतेय काय पचतेय याचा विचार न करता केवळ पाठांतर केले आहे म्हणून आणि मुद्दयांचा क्रम
लक्षात असल्यामुळे तशा पध्दतीने मुद्दे मांडत जाणे म्हणजे विचित्र प्रकार असतो. श्रोत्यांचा
कल पाहून मुद्दयांचा क्रम उलटसुलट करता आला पाहिजे, त्याचप्रमाणे
मुद्दयांचा संकोच अथवा विस्तार करणे या गोष्टी कीर्तनकाराला ऑन दी स्पॉट करता यायला
हव्यात. त्यामुळेच कीर्तनात जिवंतपणा येतो.
मग पुस्तकात स्वरविस्तार व आलाप
देण्याचे कारण काय? ते केवळ सरावासाठी असतात हे लक्षात घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे
कीर्तनातील मुद्दयांची मांडणी कशी करावी याचा सराव करण्यासाठी कीर्तनाचा अभ्यास करून
घेतला जातो. प्रत्येक कलेत आणि क्रीडेतही वेगवेगळे सराव हे अभ्यास म्हणून केले जातात,
पण सादरीकरणाच्या वेळी जशी परिस्थिती समोर येईल त्याला अनुसरून कामगिरी
करणे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. ही उपजत बुध्दी शिकविता येत नाही. प्रत्येक कलेची
हीच मर्यादा आहे. त्यातील शास्त्र केवळ शिकविता येते, कला ही
अभ्यासाने म्हणजे सरावाने येत असते. मित्रांनो, कीर्तन शिकणारे
कितीजण कीर्तनाचा सराव करतात? आपले केवळ शिक्षण सुरू आहे. सराव
नाही! तेव्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की, कीर्तनाची सुरुवात
म्हणून छोटयामोठया समारंभात दहापाच मिनिटांची भाषणे, एखाद्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, कविता वा नाटयछटेचे सादरीकरण,
एकपात्री प्रयोग, कथेचे अभिवाचन, प्रवचन व निरुपण हे उपक्रम आठवडयातून एकदा, पंधरवडयातून
एकदा, किमान महिन्यातून एकदा तरी करायलाच हवे. असे करता आले नाही
तर कीर्तनाचे शास्त्र कळेल, पण कीर्तन कधीच करता येणार नाही.
हा धोक्याचा इशारा येथे द्यायलाच हवा. यासाठी आपल्या परिसरात असे उपक्रम करणाऱ्या संस्था
शोधा, असे उपक्रम कोठे चालतात त्याचा शोध घ्या, अशा उपक्रमाच्या आयोजकांशी संपर्क करा, त्यांच्याकडून
वरील जबाबदारी मागून घ्या. यामुळे आपला जनसंपर्कसुध्दा वाढेल. कीर्तनासाठी बोलावणे
येण्यासाठी हा जनसंपर्क उपयोगी पडेलच!
No comments:
Post a Comment