हार्मोनिअम वादनातील बारकावे
- ह.भ.प. दीपक हनुमंत जेवणे (कीर्तन विशारद)
माझा मागचा लेख वाचून माझी पध्दत कोणती आहे हे विचारणारे बरेच दूरध्वनी आले. माझी
काही जगावेगळी पध्दत नाही, पण हार्मोनिअम वादनातील जे बारकावे सहसा कोणी लक्षात आणून देत
नाहीत अथवा सांगत नाहीत आणि विद्यार्थी अज्ञानातून सराव करीत राहतात ते बारकावे सांगून
वादनाच्या पायऱ्या मी समजावून देतो, हीच माझी पध्दत होय. येथे
काही बारकावे सांगत आहे.
काही लोक हार्मोनिअमच्या पट्टयांवर स्वरांची नावे चिकटवतात आणि ती वाचत वादनाचा
सराव करतात. मी नम्रपणे सांगू इच्छितो. ही चुकीची पध्दत आहे. मी तर सांगेन आपल्या इष्टदेवतेचे
छायाचित्र समोर ठेवा आणि त्याच्याकडे पाहात सराव करा. लवकर पेटी वाजवता येईल. कोणीही
वादक पेटीच्या पट्टयांकडे पाहात पेटी वाजवित नाही. चुकीची सवय लावून घेऊ नका.
माझे एक मित्र मन लावून हामोंनिअमचा सराव करीत असत. पण आजही त्यांना हार्मोनिअम
नीट वाजविता येत नाही. त्यांनी अलंकार वादनाचा सराव तबल्याच्या तालांशिवायच केला आहे.
ताल त्यांच्या डोक्यात कधीच बसला नाही. गायकाला अथवा वादकाला तालाची समज असायलाच हवी.
यासाठी मी तर सांगतो पहिल्या दिवसांपासून सताल अलंकार सराव झाला पाहिजे.
त्यासाठी तालाच्या मात्रा हातावर मोजत ताल डोक्यात भिनवायला हवा. तालाचे बोल ऐकत
या मात्रा मोजाव्यात. कोणत्या मात्रेवर कोणता बोल आहे व सम आणि काल कोठे आहे ते लक्षात
घ्यावे.
भजन कीर्तनासाठी हार्मोनिअम शिकणाऱ्यांनी त्रिताल, कीर्तनी धुमाळी
आणि भजनी धुमाळी या किमान तालांचा सुरुवातीला सराव करायलाच हवा.
या तालांची दुगुन, तिगुन व चौगुन कशी होते याचा सराव करायला हवा.
आपण नोटेशन्सची अनेक पुस्तके पाहतो. त्यात सम आणि मात्रांसहित स्वरलिपी दिली असते.
पण त्यांचे गणित आपल्याला माहीत नसल्यामुळे त्यावरून वादन करता येत नाही.
केवळ तालांतच दुगुन, चौगुन नसते. स्वरांचीही दुगुन, चौगुन वाजविता
यावी लागते.
एकाच मात्रेत स्वर दोनदा, तीनदा, चारदा वाजला तर स्वराची दुगुन,
तिगुन आणि चौगुन होते.
आता आपण उदाहरणच घेऊ.
दुर्गा रागातील कीर्तनी धुमाळी तालातील नमनाचे पद आहे.
१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ १ २ ३ ४ ५ ६ ७ ८
रा ऽम कृ ष्ण ह री जय जय रा ऽ ऽ म रा जा
रा म ।
म धध प प म रे मम पप ध - - सां प प म म ।
वर शब्द आणि खाली त्याला अनुसरून स्वर दिले आहेत.
येथे धध, मम,
पप ही स्वरांची दुगुन आहे. म्हणजे एकाच मात्रेत स्वर दोनदा वाजला आहे.
तर रा ऽ ऽ म असे म्हणताना ध - - सां यामध्ये ध हा स्वर तीन मात्रा लांबला आहे,
हे लक्षात घेतले पाहिजे.
एका मात्रेत एकापेक्षा जास्त स्वर वाजविणे आणि एकच स्वर एकापेक्षा जास्त मात्रेत
लांबविणे हा सरावाचा भाग असायला हवा.
अजूनही बरेच बारकावे आहेत, किंबहुना वर दिलेले बारकावेसुध्दा मी थोडक्यात सांगितले आहेत.
त्यावर अधिक तपशीलात विवरण केले जाऊ शकते.
माझी पध्दत विचारण्यासाठी दूरध्वनी आल्यामुळे ही हे बारकावे
दिलेले आहेत. पायरी-पायरीने संगीत म्हणजे वादन शिकावे ही माझी पध्दत आहे व त्या पायऱ्या
मी व्यवस्थित समजावून देतो. त्यामुळे हार्मोनिअम वादन सुलभपणे शिकता येते, एवढेच
मी सांगू इच्छितो. योग्य मार्गाने उचित सराव केला तर आपण लवकर वादन शिकू शकतो हेच मला
सांगायचे आहे.
No comments:
Post a Comment