Friday, 6 January 2017

मूर्ती फोडा, मूर्ती तोडा इतिहासाला ध्वस्त करा!

मूर्ती फोडा, मूर्ती तोडा
इतिहासाला ध्वस्त करा!
- दीपक हनुमंत जेवणे



पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा काही जणांनी उखडून फेकला. गडकरी यांचे अपूर्ण नाटक 'राजसंन्यास' हे त्यासाठी कारणीभूत ठरलेले आहे. कलाकाराला आपल्या प्रतिभेच्या अभिव्यक्तीचे पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि ते तसेच राहिले पाहिजे, याबाबत काही दुमत असण्याची गरज नाही. सुबुध्द रसिक पे्रक्षक हा ललित साहित्यकृती अथवा नाटयकृतीला इतिहास समजण्याची गल्लत करीत नाही; तो केवळ त्या कृतीचा रसास्वाद घेतो. इतिहास आणि ललित साहित्यकृती या दोन गोष्टी भिन्न आहे, हे त्याला पटले असते.
ऐतिहासिक नाटकांवर टीका केली जाते याची पगडी यांना जाणीव असल्यामुळे ते या टीकेचे खरे मूळ शोधण्याचा प्रयास त्यांनी आपल्या परीने केला होता. ऐतिहासिक नाटकांवर टीका करणाऱ्या टीकाकारांची भूमिका इतिहास संशोधकाची नसते हे त्यांनी निखालसपणे दर्शवून दिले होते. मात्र त्यांनी रसिक आणि समाजनिरीक्षक अशी दोन प्रकारची भूमिका सांगितली होती. पगडी हे नाटकांच्या सेन्सार बोर्डाचेही अध्यक्ष होते, हे लक्षात घ्यावे. पण आता या टीकाकांरात आणखी भर पडली आले ती केवळ पुतळेच नव्हे तर इतिहासाची मोडतोड करण्यात धन्यता मांडणाऱ्या स्वयंघोषित इतिहासकारांची! आपण जो इतिहास सांगतो तोच खरा असून तो समाजावर थोपण्याचा प्रयास या विघ्नसंतोषी मंडळींनी चालविला आहे.
थोर इतिहास संशोधक सेतुमाधवराव पगडी या नाटकाबाबत काय म्हणतात - 'या स्वातंत्र्यामुळेच भाऊबंदकी, सवाई माधवरावाचा मृत्यू, राजसंन्यास, इ. अप्रतिम नाटकांची मराठीला देणगी मिळाली. बखरीतील त्रोटक माहितीच्या आधारे व्यक्तींच्या मूळ प्रेरणेकडे धाव घेऊन गडकऱ्यांनी जो संभाजी उभा केला आहे, तेथपर्यंत इतिहाससंशोधकांनाही पोहोचता आले नाही. हे गडकऱ्यांच्या असामान्य प्रतिभेचे असामान्य यश आहे. मूळ इतिहासात संभाजीराजांना ज्या दिवशी म्हणजे 1689च्या पंधरा फेब्रुवारी रोजी मोगलांच्या छावणीत आणण्यात आले, त्याच दिवशी त्यांचे डोळे काढले आहेत, त्यामुळे सोडविण्याचा प्रयत्न होणे शक्यच नव्हते. तरी पण ती शक्यता कल्पून गडकऱ्यांनी संभाजीच्या तोंडून राजधर्माचे जे अप्रतिम निष्कर्ष काढले आहेत, त्यामुळे संभाजीराजांचे व्यक्तिमत्त्व एका दिव्य आणि भव्य पातळीवर जाऊन पोहोचले आहे.'

पगडींनी जाणवले होते की, विषयाची निवड, घटनांचे फेरफार, व्यक्तींच्या आयुष्यातील चढउतार, त्यांचे स्वभावविशेष इत्यादींवर लेखणी चालवीत असताना आपले अनेक ललित लेखक हे व्यक्तिगत संकोचाच्या पोटी समाजाला भिऊन लिहित आहेत की काय, असे वाटू लागते. जणू काय ते लिहीत असताना त्यांच्या पाठीमागून कोणीतरी त्यांच्या लेखनाकडे सतत लक्ष ठेवून आहे, कोणती अनामिक भीती त्यांना ग्रासते आहे, हे सांगता येत नाही. पण चिकित्सक रसिकांना ते समजण्यासारखे आहे. संभाजीराजांचे श्रेष्ठत्व आणि त्यांचे मराठयांच्या इतिहासातील अमर स्थान हे त्यांच्या अपूर्व साहसात आणि मोगलांशी त्यांनी जिद्दीने आणि बेडरपणे गाजविलेल्या निकराच्या संघर्षात आहे. पगडींनी आपल्या लेखनात दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते. संभाजीराजांच्या अपूर्व कामगिरीपुढे अन्य गोष्टी या क्षुद्र अगर नगण्य ठरतात किंवा अप्रस्तुत तरी ठरतात, असे असूनही कथाकार आणि नाटककार यांची लेखणी त्यांच्या व्यसनांकडे वारंवार का वळतेबाजीरावाच्या पराक्रमाकडे दुर्लक्ष, पण बाजीराव-मस्तानी प्रकरणावर पुन्हा पुन्हा लेखन, हा काय प्रकार आहे?
पगडी यांनी 23 फेब्रुवारी 1985 रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वार्षिकोत्सवात अध्यक्षीय भाषण करताना असे स्पष्ट केले आहे की, ऐतिहासिक नाटकात किंवा काव्यात काव्य आणि नाटक हे प्रमुख होत, इतिहासाचे स्थान दुय्यम. अशा वाङ्मयाचे वाङ्मयीन दृष्टीकोनातूनच परीक्षण झाले पाहिजे. इतिहासाचा अभ्यासक हाही त्याच दृष्टीकोनातून ललित वाङ्मयाकडे पाहतो.
मात्र सध्याची समाजातील परिस्थिती पाहता आपण ही दृष्टी गमावत चाललो आहे का? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.
पगडी यांनी पुढे सांगितले होते, 'महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास, महाराष्ट्रातील बव्हंशी समाज हा ललित कृतीतूनच इतिहास शिकणारा दिसतो. तो स्वच्छ इतिहासाला रुक्ष समजतो. त्यामुळे ऐतिहासिक नाटकांतील अगर कादंबऱ्यांतील घटना या सत्याच असतील असे समजण्याची प्रवृत्ती सामान्यपणे दिसून येते. ती दूर करावयाची असेल तर सामाजिक प्रबोधन हाच एक मार्ग आहे. दमदाटी समाजाला फॅसिझमकडे नेणारी आहे. अशामुळे लेखकांचे स्वातंत्र्य संपुष्टात येईलच; समाजही असहिष्णू होत जाईल.
तीस वर्षांपूर्वी पगडी यांनी ही भीती व्यक्त केली होती. आज आपण ही गोष्ट अनुभवतो आहोत.  आपले दुर्दैव असे आहे की आम्ही समाजप्रबोधनाच्या मार्गाकडे पाठ फिरविली आहे आणि पुतळयांची मोडतोड करीत त्यातून इतिहासाची मोडतोड करण्याचा केविलवाणा मार्ग अंगीकारला आहे. यातून काय साध्य होणार आहे, हा प्रश्नच आहे. समाजात अशा घटना वारंवार घडणे ही समाजाच्या निकोप आरोग्याच्या दृष्टीने भयसूचक घंटा आहे. वेळीच सावध होऊन इतिहासाकडे त्याचप्रमाणे साहित्यकृतींकडे निकोष दृष्टीकोनातून पाहण्याचा समाजप्रबोधनकारी मार्ग स्वीकारणे अत्यंत निकडीचे आहे.

***


Thursday, 26 May 2016

दृष्टांताची मात 

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वैशिष्टय म्हणजे एखादा तात्त्वि मुद्दा समजावून सांगण्यासाठी ढिगभर सोपे सोपे दृष्टान्त त्यांनी दिले आहे. एवढा दृष्टान्तांचा खजिना ज्ञानेश्वरीत आहे की त्याचा स्वतंत्रपणे अभ्यासच करायला हवा. उदाहरणादाखल बाराव्या अध्यायातील काही दृष्टान्त येथे देत आहोत.

देवभक्त ऐक्य
सूर्यबिंब नाहीसे झाले की सूर्यकिरणेही त्याच्या मागोमाग नाहीशी होतात. अगदी त्याचप्रमाणे माझा भक्त माझ्यात सामावून जातो.

निराकाराची उपासना/निर्गुण भक्ती
पतिशिवाय रोज चितेवर बसून सती जाणे जसे अवघड आहे तसे निराकाराची उपासना करणे महाकठीण आहे.

निराकाराची प्राप्ती
पांगळया माणसाला वाऱ्याबरोबर धावण्याची शर्यत जिंकता येत नाही. त्याचप्रमाणे मी देह आहे ही भावना असलेल्या मनुष्याला निराकार ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही.

देवभक्त नाते
आपण जन्माला घातलेले मूल आईला जितके प्रिय असते तितका मला माझा भक्त प्रिय असतो.

देवभक्त नाते
आईच्या पोटातील गर्भ ज्याप्रमाणे आईचे स्वरूप जाणू शकत नाही, त्याचप्रमाणे मनुष्य भगवंताला जाणू शकत नाही.

देवभक्त नाते
राजाच्या राणीला हवी ती वस्तू मागितल्याबरोबर मिळते, त्यासाठी कोणाकडे याचना करावी लागत नाही. माझ्या भक्तांनाही कुणाकडे भीक मागावी लागत नाही.

प्राण व शरीर 
एकदा शरीरातून प्राण बाहेर पडला की सर्व इंद्रियांचा कारभार आपोआप थंडावतो, त्याचप्रमाणे भक्ताने आपले मन ईश्वराला अर्पण केले की त्याचा सर्व अहंकार नाहीसा होतो.

चंद्रबिंब 
पौर्णिमेचे चंद्रबिंब हळूहळू लहान होत शेवटी अमावस्येला पूर्णतः दिसेनासे होते. त्याचप्रमाणे मनुष्याने विषयभोगातून आपले मन हळूहळू काढून घेण्यास सुरुवात केल्यास तो ईश्वराच्या रूपात पूर्णतः लीन होऊन जातो.

अभिमान 
पाटाचे पाणी माळी नेईल तिकडे निमूटपणे जाते, त्याचप्रमाणे कर्तृत्वाचा अभिमान सोडून आपल्या हातून भगवंत जे काम करून घेणार आहे ते आपण करीत नाही याच भावनेने करावे.

चाले हे शरीर 
रस्ता सरळ आहे की वाकडा आहे याचा विचार रथ करीत नाही. सारथी चालविल तसा तो मुकाट चालत जातो. त्याचप्रमाणे आपल्या देहाचा रथ हा भगवंत चालवित नेत आहे अशी भावना बाळगावी.

कर्म फळ 
आपली कन्या कितीही सुंदर असली तरी पिता तिचा अभिलाष धरत नाही. फळे कितीही मधुर असली तरी झाड त्याचा अभिलाष धरत नाही. पिता कन्यादान करतो तर झाडे पिकलेली फळे खाली लोटून देतात. माणसाने कर्मफळाबाबत तसेच उदास झाले पाहिजे.

जन्म मरण नाही 
वेळूचे झाड एकदा व्याले की पुन्हा वीत नाही. कर्मफळाचा एकदा त्याग केला की मग जन्ममरण पुन्हा नाही.

गायन आणि कीर्तन

संगीत म्हणजे गायन आणि कीर्तन यांच्यातील एक वेगळाच संबंध परवा उमगला. राग गाताना स्वरविस्तार अथवा आलाप करण्याची पध्दत आहे. वेगवेगळया पुस्तकातून एकाच रागाचे स्वरविस्तार व आलाप वेगवेगळे दिलेले असतात. विद्यार्थ्याने नेमका कोणता स्वरविस्तार अथवा आलाप पाठ करावा? हा प्रश्न पडला. याचे उत्तर असे की, स्वरविस्तार अथवा आलाप पाठ कशाला करावा. पाठ केलेले आलाप घेण्याची सवय लागल्यास गायन ठोकळेबाज बनते व त्यात जिवंतपणा उरत नाही. एकदा राग आणि त्यातील स्वर कळले, स्वरसंगती कळली आणि अलंकारांचा अभ्यास चांगला जमलेला असला तर मग उत्स्फूर्त आलाप घेता येतात. गायनात जिवंतपणा येतो.
कीर्तनाचेही तसेच आहे. वेगवेगळे अभंग, श्लोक, आर्या, ओव्या यांचे पाठांतर यासाठीच करावे लागते. पण सेवेला घेतलेल्या अभंगाचा जेव्हा विस्तार करायचा असतो तेव्हा तो ठोकळेबाजपणे केल्यास त्यात जिवंतपणा उरत नाही. जिवंतपणा म्हणजे श्रोत्यांशी संवाद होय. कीर्तनाची मांडणी कशी करावी याचे पाठांतर केले जाते. पण आयत्यावेळी कीर्तन चालू असताना श्रोत्यांना काय रुचतेय काय पचतेय याचा विचार न करता केवळ पाठांतर केले आहे म्हणून आणि मुद्दयांचा क्रम लक्षात असल्यामुळे तशा पध्दतीने मुद्दे मांडत जाणे म्हणजे विचित्र प्रकार असतो. श्रोत्यांचा कल पाहून मुद्दयांचा क्रम उलटसुलट करता आला पाहिजे, त्याचप्रमाणे मुद्दयांचा संकोच अथवा विस्तार करणे या गोष्टी कीर्तनकाराला ऑन दी स्पॉट करता यायला हव्यात. त्यामुळेच कीर्तनात जिवंतपणा येतो.

मग पुस्तकात स्वरविस्तार व आलाप देण्याचे कारण काय? ते केवळ सरावासाठी असतात हे लक्षात घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे कीर्तनातील मुद्दयांची मांडणी कशी करावी याचा सराव करण्यासाठी कीर्तनाचा अभ्यास करून घेतला जातो. प्रत्येक कलेत आणि क्रीडेतही वेगवेगळे सराव हे अभ्यास म्हणून केले जातात, पण सादरीकरणाच्या वेळी जशी परिस्थिती समोर येईल त्याला अनुसरून कामगिरी करणे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. ही उपजत बुध्दी शिकविता येत नाही. प्रत्येक कलेची हीच मर्यादा आहे. त्यातील शास्त्र केवळ शिकविता येते, कला ही अभ्यासाने म्हणजे सरावाने येत असते. मित्रांनो, कीर्तन शिकणारे कितीजण कीर्तनाचा सराव करतात? आपले केवळ शिक्षण सुरू आहे. सराव नाही! तेव्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की, कीर्तनाची सुरुवात म्हणून छोटयामोठया समारंभात दहापाच मिनिटांची भाषणे, एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, कविता वा नाटयछटेचे सादरीकरण, एकपात्री प्रयोग, कथेचे अभिवाचन, प्रवचन व निरुपण हे उपक्रम आठवडयातून एकदा, पंधरवडयातून एकदा, किमान महिन्यातून एकदा तरी करायलाच हवे. असे करता आले नाही तर कीर्तनाचे शास्त्र कळेल, पण कीर्तन कधीच करता येणार नाही. हा धोक्याचा इशारा येथे द्यायलाच हवा. यासाठी आपल्या परिसरात असे उपक्रम करणाऱ्या संस्था शोधा, असे उपक्रम कोठे चालतात त्याचा शोध घ्या, अशा उपक्रमाच्या आयोजकांशी संपर्क करा, त्यांच्याकडून वरील जबाबदारी मागून घ्या. यामुळे आपला जनसंपर्कसुध्दा वाढेल. कीर्तनासाठी बोलावणे येण्यासाठी हा जनसंपर्क उपयोगी पडेलच! 

निरुपणातील मुद्दयांचा क्रम आणि आराखडा


1. देव आपल्या भक्तांची संकटे स्वत: सोसत असतो.

2. भक्त म्हणजे कोण? आपल्या देहाविषयी जे उदास म्हणजे निरपेक्ष आहेत, ज्यांचे सर्व आशापाश तुटलेले आहेत , ज्यांना  जन, धन, माता, पिता या ऐहिक गोष्टींची आवड उरलेली नाही. कारण केवळ 'नारायण' हाच त्यांचा विषय झाला आहे. तेच खरे भक्त होत.

3. देव संसाराविषयी उदासीन असलेल्या भक्ताच्याच मागे धावतो.

4. अभक्त म्हणजे कोण? कमळ आणि बेडूक एकाच ठिकाणी म्हणजे नदीच्या चिखलात असतात. पण बेडूक कधीही मकरंदाचे सेवन करीत नाही. भुंगा मात्र अत्यंत दूरवरून येतो आणि मकरंदाचे सेवन करून जातो.

5. दृष्टान्तः एकाला चिखल मिळतो आणि एकाला मध मिळतो.

6. सर्व सुखाचे मूळ असलेला भगवंत सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात आहे, पण श्रध्दा नसलेल्यांना त्याची प्राप्ती होऊ शकत नाही.

7. निर्वाणीचे संकट कोसळल्यास देव भक्ताला पोटाशी धरून ठेवतो. एका प्रकारे देव त्याचा अंकित होऊन जातो.

8. अनन्यभावाने शरण आलेल्या भक्तांची सेवा प्रत्यक्ष परमात्मा करतो व त्यांची सतत काळजी वाहतो.

9. ज्या ठिकाणी वैष्णव कीर्तन करतात तेथे हा श्रीपती उभा राहतो.
10. या देवाला कीर्तनाची इतकी गोडी आहे की तो चक्क उडया मारत कीर्तनात येऊन उभा राहतो.

11.एक क्षणसुध्दा वाया न दवडता  नामस्मरण केले पाहिजे. तर मग वेळ न लावता भगवंत धावून येतो.

12. भगवंतांच्या नामामुळे अवघ्या जगातील दुःखे नाहीशी झाली. सगळीकडे सुखच सुख निर्माण झाले.

13. फक्त नामसंकीर्तन करा. तो भगवंत तुमच्या घरी पत्ता विचारत येतो.

14. हा पांडुरंग सर्व ठिकाणी व्यापून राहिलेला आहे व सर्वत्र भरून उरला आहे.

15. जनाबाई म्हणतात - देवाशिवाय काहीच रिकामी जागा शिल्लक नाही.

16. दृष्टान्त - गणपती असो की उंदीर असो. शेवटी सोने ते सोनेच त्यामुळे दोघांचाही भाव एकच.


17. सर्वत्र देव भरून राहिलेला आहे असा अनुभव भक्ताला आला म्हणजे त्याला आत्मज्ञान झाले.

Friday, 29 April 2016

भाषणाचे अष्टादशअवधान
अर्थात उत्तम भाषणाची अठरा सूत्रे
ह. भ. प. दीपक महाराज जेवणे


भाषण रंगविताना वक्ता सर्वांसमोर एक आभासी कल्पनाचित्र साकार करीत असतो. हे करताना त्याच्याकडे केवळ एकच प्रमुख साधन असते, ते म्हणजे त्याचा आवाज. याला पूरक साधन असते अभिनयाचे. पण व्यासपीठावर समोर ध्वनिवर्धक ठेवून बोलत असल्यामुळे शारीरिक हालचालींवर फारच मर्यादा येतात. त्यामुळे त्याला मुद्राभिनय, हावभाव, हातवारे यांच्यावरच वेळ मारून न्यावी लागते. जर प्रेक्षकांची संख्या जास्त असल्यास व पुरेसा प्रकाश नसल्यास मुद्राभिनय लोकांना दिसत नाही. त्यामुळे आवाज हेच वक्त्याचे प्रमुख साधन होय! केवळ आवाजाच्या माध्यमातून कल्पनाचित्र कसे साकार करता येते हे आपण आवाज जोपासना शास्त्राच्या माध्यमातून जाणून घेऊया.
आवाज जोपासना म्हणजे काय?
पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाला आवाज ही गोष्ट जन्मतःच मिळालेली असते. आवाज निर्मितीची निसर्गदत्त यंत्रणा आपापल्या शरीरात असते. पण ही यंत्रणा कार्यक्षमपणे कशी वापरावी? त्याचे कोणते तंत्र आहे? कमीत कमी प्रयासाने आपल्याला तिचा कसा चांगला वापर करता येईल? या गोष्टी जाणून घेण्यासाठी आवाज जोपासना शास्त्राचा उपयोग होतो.
हे शास्त्र शिकून घेताना काही पथ्ये पाळली पाहिजे तर काही तत्त्वे  समजून घेतली पाहिजेत.
1. अनुकरण टाळा.
बरेचदा भाषणाच्या बाबतीत माणूस कोणाला तरी आपला आदर्श मानून त्याचे अनुकरण करीत असतो. असे अनुकरण करणे चुकीचे असते. प्रत्येकाचा आवाज आणि आवाजनिर्मितीची पध्दत वेगळी असते. त्यामुळे दुसऱ्याची नक्कल करणे योग्य नसते. तसेच दुसऱ्याची नक्कल करून आपले वेगळे व्यक्तिमत्त्व कधीच तयार होणार नाही. परिणामी समाजावर आपला प्रभाव पडणार नाही.
2. चुकीच्या संकल्पना मनाशी धरू नका.
कोणती भाषणशैली चांगली आणि कोणती वाईट याबाबत आपणच काही कल्पना निश्चित केल्या असतात. त्या बऱ्याचदा चुकीच्या असतात. दूरचित्रवाणी व अन्य माध्यमातून आपल्याला जे भाषणशैलीचे नमुने दृष्टीस पडतात ते बऱ्याचदा बटबटीत असतात. मात्र त्यांचा प्रभाव पडत असल्यामुळे आपण त्याकडे आकर्षित होत असतो. भाषणाच्या गुणवत्तेचे भान नसल्यामुळे मग आपण अशा नमुन्यांचे अनुकरण करू लागतो. हे चूक आहे.
3. कृत्रिम आवाजनिर्मिती टाळा.
दुसऱ्याच्या अनुकरणातून आपल्याला आवाज वापरण्याच्या निरनिराळया कृत्रिम सवयी जडतात. मात्र यामुळे आवाज आणि भाषण यांच्या विविध समस्या निर्माण होतात. तसेच यामुळे आपण श्वासोच्छवास, हावभाव, हातवारे, आवाजाचा पोत, उच्चारशैली याबाबतीत  अनेक माणसे स्वतःचा ठसा गमावून बसतो.
4. दुसऱ्यांच्या प्रभावातून मुक्त व्हा.
चुकीचे आदर्श मनात बाळगू नका. अशा प्रभावातून मुक्त व्हा आणि आपल्या आवाजाला स्वतंत्र करा. आपला स्वतंत्र ठसा निर्माण करा. दुभंग व्यक्तिमत्त्वापासून बचाव करा.
खाजगी संभाषणात वेगळा आणि सार्वजनिक भाषणात वेगळा असे दोन प्रकारचे आवाज वापरणे धोक्याचे आहे. कारण हे दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे. आवाज हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा असतो. आवाज व भाषण यांच्यात एकात्मता, एकसंधता आणल्यावर व्यक्ती मूलभूत पातळीवर बदलू लागते. आवाज व भाषण सुधारले की व्यक्तिमत्त्वात आपोआप सुधारणा होऊ लागते.
5. आवाज आणि भाषण याविषयी दक्ष राहा.
भाषण आपोआपच येत असते असे गृहित धरल्यामुळे आपण बोलणे हरवून बसलो आहोत. कसे व काय बोलावे याविषयी दक्ष राहण्याकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. आपल्याला काय म्हणावयाचे आहे ते नेमकेपणे व नीटपणे सांगता आले पाहिजे, आपला आशय दुसऱ्यापर्यंत विकृत न होता पोहोचला पाहिजे. कारण त्याशिवाय मानवी व्यवहार सफल होऊ शकत नाही.
6. शारीरिक आणि मानसिक यंत्रणांवर ताबा मिळवा.
शारीर-मानस यंत्रणांवर ताबा मिळविण्याइतपत लोकांची तयारी नसल्यामुळे आवाज चढविणे, लांब वाक्ये सहजपणे व पूर्णपणे उच्चारणे, भाषणात हवी तेव्हा हवी तितकी भावव्यक्ती राहणे याबाबतीत लोक कमी पडतात. आशय अभिव्यक्तीसाठी आवाज व भाषण सक्षम झाले पाहिजे. विशिष्ट प्रसंग, मनोवस्था आणि परिस्थितीस आवाज व भाषणाद्वारे प्रतिसाद देऊ पाहणाऱ्या संवेदनशील मनाला आवश्यक ती कौशल्ये कंठगत असली पाहिजेत.
7. प्रेक्षक आणि श्रोते यांचे मन आकर्षित करून घ्या.
कलाकाराचे पहिले उद्दिष्ट म्हणजे प्रेक्षकांचे मन आकर्षून घेणे. भाषण अथवा सादरीकरण करताना आपण प्रेक्षकांचे मन आकर्षित करण्याकडे लक्ष पुरविले पाहिजे.
8. प्रेक्षक आणि श्रोते यांना मूल्यात्मक अनुभव द्यावा.
आपल्याकडे आकर्षित झालेल्या प्रेक्षकांना काही मूल्यात्मक अनुभव देणे हे कलाकाराचे दुसरे उद्दिष्ट असते. हा अनुभव त्यांच्या मनात ठसला पाहिजे. तसेच हा अनुभव त्यांच्या आपापल्या व्यक्तिमत्त्वाचा एक अपरिहार्य घटक बनावा हे वक्त्याचे मुख्य ध्येयच असते. असे झाले म्हणजे वक्त्याचा श्रोत्यांवर प्रभाव पडला असे मानण्यास मुळीच हरकत नाही.
9. चिंतन करा.
वरील सर्व बाबी जेव्हा बोलणारा अर्थात भाषण करणारा मनुष्य लक्षात घेतो, तेव्हा त्याला आपण कशी वाटचाल केली पाहिजे हे उमगत जाते. आपल्या भाषणाच्या खटाटोपातून आपण काय साध्य करणार आहोत, याबाबतची सुस्पष्ट कल्पना मनुष्याच्या मनात साकार होते. ही उत्तम भाषणाची आवश्यक बाब आणि प्रारंभ असतो. निरुद्देश बोलणे अथवा भाषणातून काहीही साध्य होत नसते, मग वक् त्याचा प्रभाव तरी कसा पडावा? हे लक्षात घेतले पाहिजे.
10. आपला कणा ताठ ठेवा.
आवाज निर्मिती करताना बोलण्यासाठी व गाण्यासाठी आवश्यक त्या प्रकारची श्वसनक्रिया सुलभपणे व क्षमतेने करावयाची असल्यास श्वसनपटलाच्या हालचालींना अडथळा होता कामा नये यासाठी ताठ बसणे व ताठ उभे राहणे अत्यंत आवश्यक असते. या आरामखुर्चीत बसून करण्याच्या क्रिया मुळीच नव्हेत!
11. एकसुरीपणा टाळा.
काही वक्ते एकसुरी आवाजात भाषण करतात. हा दोष समजला पाहिजे. पण दोषभूत एकसुरीपणा म्हणजे काय? तर श्रोत्यांच्या सहज ध्यानात न येण्यासारखे चढउतार आपल्या भाषणात करणे होय. भाषण परिणामकारक होण्याकरिता जितक्या प्रमाणात चढउतार असावे लागतात त्यापेक्षा कमी असणे म्हणजे एकसुरीपणाचा दोष.
12. भाषण आणि गायन यातील फरक लक्षात घ्या.
गायन आणि भाषण या दोन वेगळया गोष्टी आहेत. कारण निश्चित स्वरांतरावर विसंबून राहणारे संगीतातील चढउतार भाषणातील चढउतारापेक्षा संख्येने अल्प असतात पण ते नेमके असतात, तर भाषणातील चढउतार संख्येने जास्त व ढोबळ असतात.
13. सूर पकडण्याचा अभ्यास करा.
एखादा स्वर निश्चित करून त्याच्या वरखाली न जाता भाषण करणे एक महत्त्वाचा अभ्यास आहे. एक सूर पकडायचा असेल तर तारतेची एक निश्चित पातळी (पट्टी) पकडून ध्वनी निर्माण करावा लागतो. एकच सूर उमटविण्यासाठी आपल्या उच्छवासावर चांगले नियंत्रण ठेवावे लागते. हे तर अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर शक्य होत असते, तेव्हा हा दोष नव्हे! शिवाय एकापाठोपाठ चढत्या व उतरत्या निरनिराळया स्वरांवर भाषण म्हणण्याचा सराव ठेवल्यास श्वासाचा उपयोग व तारता पातळीवर नियंत्रण ठेवता येते.
14. भाषणाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.
काही वक्ते भरभर बोलतात तर काही वक्ते अडखळत बोलतात. काही वक्ते तर या दोन्ही गोष्टींचे आपल्या भाषणात मिश्रण करतात. वेगात बोलणे म्हणजे द्रुत भाषण होय. पण या भाषणाचासुध्दा एक वेग ठरलेला असतो. आपले बोलणे ऐकणाऱ्याला कळले पाहिजे ही अट पाळून एका सेकंदात किमान पाच अक्षरे उच्चारली तर त्या भाषणाला द्रुत भाषण म्हणायला हवे. यासाठी पुकारे, ललकारी व दवंडी यांचा अभ्यास करता येतो. आपली उच्चारगती द्रुत असून घंटानादाप्रमाणे ऐकणाऱ्याच्या कानावर एकापाठोपाठ शब्द आदळले पाहिजेत. बोलावयाचा मजकूर दीर्घ असल्यास त्याचे खंड पाडून आवाजाची फेक करावी. म्हणजे हे द्रुत भाषणही श्रोत्यांना ऐकण्याजोगे होते.
15. धावत्या वर्णनाचा अभ्यास हवा.
समोर घडणाऱ्या घटनेचे भाषणकर्त्याने तत्काल व अखंड शब्दांकन करत जाणे म्हणजे धावते वर्णन होय. आपल्यासमोर  घडणाऱ्या घटनेतील बारीकसारीक तपशील टिपत त्यातील गतिमानतेत खंड पडणार नाही, असे भाषण यावेळी करावे लागते. मात्र धावते वर्णन करण्यासाठी चांगली कल्पनाशक्ती आवश्यक असते.
16. ध्वनिवर्धकाचे भान पाळा.
आता सर्वत्र ध्वनिवर्धकांचा वापर वाढला आहे. यामुळे सूक्ष्म ध्वनिपरिणांमावर भर देणे हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. अनेक चांगल्या वक्त्यांना हे साधता येत नाही आणि त्यांचे भाषण पडते. यासाठी ध्वनिक्षेपकातून बाहेर पडणारा आपला आवाज आपण नीट ऐकणे आवश्यक असते. हा आवाज परिणामकारक व्हावा यासाठी भाषणाच्या गतीत बदल करणे आवश्यक असते. कारण भाषणगतीचे बदल भाषणास वेधक बनवितात. म्हणून आशय, भाषेचा स्तर, वगैरेंना अनुसरून उचित, अल्पावधीचे पण लक्षणीय बदल भाषणगतीत पेरले पाहिजेत. आपली भाषणगती म्हणजे अशा  विरामांचे योग्य नियंत्रण होय.
17. शब्दांचा ठसा उमटवा.
भाषण करताना श्रोत्यांच्या मनावर आपल्या शब्दांचे महत्त्व ठसविणे आवश्यक असते. वाक्यातील जो महत्त्वाचा शब्द असतो त्याची तारता आजूबाजूंच्या शब्दांपेक्षा बरीच वरची अथवा खालची ठेवून हा परिणाम साधता येतो. या शब्दाचा विशेष प्रकारे उच्चार करता येतो. वाक्याच्या आरंभी अथवा शेवटी येणारा शब्द सामान्यपणे लक्ष आकर्षून घेतो. शब्दाच्या उच्चारासाठी लागणारा कालावधी बदलून त्याचे महत्त्व ठसविता येते. शब्दाच्या उच्चारासोबत हालचाली, हावभाव अथवा हातवारे यांची जोड देता येते. शब्दाच्या पुनरावृत्तीतूनही हा परिणाम साधता येतो. भाषणाचा परिणाम वाढविण्यासाठी योग्य त्या ठिकाणी योग्य तितका आघात देणे म्हणजे बलाघात व कोणतेही खास आघात न देता बोलणे म्हणजे समाघात होय.
18. नियमित सराव आणि अभ्यास करा.
वर सांगितल्याप्रमाणे भाषणगुण साध्य होण्यासाठी नियमित अभ्यास आणि सराव करणे म्हणजेच आवाज जोपासना शास्त्र होय. आपल्या आवाजाची जोपासना केल्यास आपण चांगले वक्ता म्हणून श्रोत्यांवर प्रभाव पाडू शकतो.
हरिकीर्तन प्रबोधिनीच्या अभ्यासक्रमात आवश्यक सराव आणि अभ्यासाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी त्या गोष्टी जाणून घेऊन आपला विकास घडवावा.




Monday, 18 April 2016

हार्मोनिअम वादनातील बारकावे


ह.भ.प. दीपक हनुमंत जेवणे (कीर्तन विशारद)




माझा मागचा लेख वाचून माझी पध्दत कोणती आहे हे विचारणारे बरेच दूरध्वनी आले. माझी काही जगावेगळी पध्दत नाही, पण हार्मोनिअम वादनातील जे बारकावे सहसा कोणी लक्षात आणून देत नाहीत अथवा सांगत नाहीत आणि विद्यार्थी अज्ञानातून सराव करीत राहतात ते बारकावे सांगून वादनाच्या पायऱ्या मी समजावून देतो, हीच माझी पध्दत होय. येथे काही बारकावे सांगत आहे.
काही लोक हार्मोनिअमच्या पट्टयांवर स्वरांची नावे चिकटवतात आणि ती वाचत वादनाचा सराव करतात. मी नम्रपणे सांगू इच्छितो. ही चुकीची पध्दत आहे. मी तर सांगेन आपल्या इष्टदेवतेचे छायाचित्र समोर ठेवा आणि त्याच्याकडे पाहात सराव करा. लवकर पेटी वाजवता येईल. कोणीही वादक पेटीच्या पट्टयांकडे पाहात पेटी वाजवित नाही. चुकीची सवय लावून घेऊ नका.
माझे एक मित्र मन लावून हामोंनिअमचा सराव करीत असत. पण आजही त्यांना हार्मोनिअम नीट वाजविता येत नाही. त्यांनी अलंकार वादनाचा सराव तबल्याच्या तालांशिवायच केला आहे. ताल त्यांच्या डोक्यात कधीच बसला नाही. गायकाला अथवा वादकाला तालाची समज असायलाच हवी.
यासाठी मी तर सांगतो पहिल्या दिवसांपासून सताल अलंकार सराव झाला पाहिजे.
त्यासाठी तालाच्या मात्रा हातावर मोजत ताल डोक्यात भिनवायला हवा. तालाचे बोल ऐकत या मात्रा मोजाव्यात. कोणत्या मात्रेवर कोणता बोल आहे व सम आणि काल कोठे आहे ते लक्षात घ्यावे.
भजन कीर्तनासाठी हार्मोनिअम शिकणाऱ्यांनी त्रिताल, कीर्तनी धुमाळी आणि भजनी धुमाळी या किमान तालांचा सुरुवातीला सराव करायलाच हवा.
या तालांची दुगुन, तिगुन व चौगुन कशी होते याचा सराव करायला हवा.
आपण नोटेशन्सची अनेक पुस्तके पाहतो. त्यात सम आणि मात्रांसहित स्वरलिपी दिली असते. पण त्यांचे गणित आपल्याला माहीत नसल्यामुळे त्यावरून वादन करता येत नाही.
केवळ तालांतच दुगुन, चौगुन नसते. स्वरांचीही दुगुन, चौगुन वाजविता यावी लागते.
एकाच मात्रेत स्वर दोनदा, तीनदा, चारदा वाजला तर स्वराची दुगुन, तिगुन आणि चौगुन होते.
आता आपण उदाहरणच घेऊ.
दुर्गा रागातील कीर्तनी धुमाळी तालातील नमनाचे पद आहे.
१  २  ३ ४  ५  ६ ७  ८   १ २ ३ ४ ५ ६  ७  ८
रा ऽम कृ ष्ण ह री जय जय रा ऽ ऽ म  रा जा रा म ।
म धध प  प म रे मम पप  ध - - सां  प प म म ।
वर शब्द आणि खाली त्याला अनुसरून स्वर दिले आहेत.
येथे धध, मम, पप ही स्वरांची दुगुन आहे. म्हणजे एकाच मात्रेत स्वर दोनदा वाजला आहे. तर रा ऽ ऽ म असे म्हणताना ध - - सां यामध्ये ध हा स्वर तीन मात्रा लांबला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
एका मात्रेत एकापेक्षा जास्त स्वर वाजविणे आणि एकच स्वर एकापेक्षा जास्त मात्रेत लांबविणे हा सरावाचा भाग असायला हवा.
अजूनही बरेच बारकावे आहेत, किंबहुना वर दिलेले बारकावेसुध्दा मी थोडक्यात सांगितले आहेत. त्यावर अधिक तपशीलात विवरण केले जाऊ शकते.
माझी पध्दत विचारण्यासाठी दूरध्वनी आल्यामुळे ही हे बारकावे दिलेले आहेत. पायरी-पायरीने संगीत म्हणजे वादन शिकावे ही माझी पध्दत आहे व त्या पायऱ्या मी व्यवस्थित समजावून देतो. त्यामुळे हार्मोनिअम वादन सुलभपणे शिकता येते, एवढेच मी सांगू इच्छितो. योग्य मार्गाने उचित सराव केला तर आपण लवकर वादन शिकू शकतो हेच मला सांगायचे आहे.