Friday, 11 March 2016


हरिपाठ व मनाचे श्लोक यांतील साम्यस्थळे -  उत्तरार्ध

हरिपाठ व मनाचे श्लोक यांतील साम्यस्थळे
ह.भ.प. दीपक हनुमंत जेवणे (कीर्तन विशारद)


समर्थ पुढे सांगतात -
भ्रमे नाढळे वित्त ते गुप्त झाले ।
जिवा जन्मदारिद्रय ठाकूनि आले ॥
देहबुध्दीचा निश्चयो ज्या टळेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ 138 ॥
तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलाशी असे म्हणतात बरे! कुठे तरी आपला ठेवा पुरून ठेवावा आणि ती जागा चुकल्यामुळे कपाळकरंटयाला तो ठेवा पुन्हा मुळीच सापडू नये; कारण असा जीव जन्मदारिद्रय भोगणाराच समजला पाहिजे.
जन्म म्हणजे उपजणे आणि करंटेपण म्हणजे दारिद्रय अर्थात जन्मदारिद्रय म्हणजे उपजत करंटेपण होय. हीच गोष्ट स्पष्ट करताना माउली सांगतात -
उपजोनि करंटा नेणे अद्वैत वाटा ।
रामकृष्णी पैठा कैसेनि होय ॥ 2 ॥  
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान ।
तया कैसे कीर्तन घडे नामी  ॥ 3.9 ॥ 
द्वैताच्या झाडणीबद्दल समर्थ पुढे काय सांगतात ते पाहा -
भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे ।
भयातीत ते संत आनंत पाहे ॥
जया पाहता द्वैत काही दिसेना ।
भयो मानसी सर्वथाही असेना ॥ 136॥
भगवंताचा साक्षात्कार कसा घडून येतो याबाबत सांगताना समर्थ म्हणतात -
कळे आकळे रूप ते ज्ञान होता ।
तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था ॥
मना उन्मनी शब्द कुंठीत राहे ॥
तोचि तो राम सर्वत्र पाहे ॥ 200 ॥
माउली सूत्ररूपाने असे सांगतात -
भावबळे आकळे एरव्ही नाकळे ।
करतळी आवळे जैसा हरि ॥ 2.12 ॥ 
तळहातावर घेतलेला आवळा जसा आपण सर्व बाजूने न्याहाळू शकतो तसे हरीचे दर्शन घडते; म्हणजेच तोचि तो राम सर्वत्र पाहे ! पण केव्हा 'भावबळे आकळे' अर्थात 'कळे आकळे रूप ते ज्ञान होता!'' आहे की नाही गंमत!
भगवंताचे नाम तेचि रूप आणि रूप तेचि नाम हे अभिन्नत्व ठसावणारे साम्य आपल्याला या दोन्ही संतांच्या रचनेमध्ये खालीलप्रमाणे दिसते-
समर्थ सांगतात -
नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे ।
रघूनायका उपमा ते न साहे ॥ 197 ॥
माऊली सांगतात -
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड ।
गगनाहूनी वाड नाम आहे ॥ 4.22 ॥
थोडक्यात सांगायचे तर, नभ म्हणजेच गगन होय! आकाशाने संपूर्ण सृष्टीला व्यापून टाकलेले असल्यामुळे भगवंताच्या रूपाला तशी उपमा देता येईल का? समर्थ सांगतात की, मुळीच नाही! भगवन्नाबाबतही गुरु निवृत्ती महाराज माउलींना तेच सांगतात की, गगनाहूनी वाड नाम आहे! एकूण काय - भगवंताचे नाम आणि रूप नभाहूनही 'पर' असे आहे!
रामनामाचे महत्त्व इतके मोठे आहे की, स्वतः भगवान शंकरसुध्दा रामनामाचा जप करतात असे मनाच्या श्लोकात पुढे समर्थ सांगतात -
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥31॥
बहू नाम या रामनामी तुळेना ।
अभाग्या नरा पामरा हे कळेना ॥
विषा औषधा घेतले पार्वतीशे ।
जिवा मानवा किंकरा कोण पूसे ॥82॥
जेणे जाळिला काम तो राम ध्यातो ।
उमेसी अती आदरे गूण गातो  ॥
हाच भाव व्यक्त करताना माऊली हरिपाठात सांगतात -
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा ।
आत्मा जो शिवाचा रामजप  ॥ 2.8 ॥
राम नामाचा जप हा भगवान शिवाचा आत्मा म्हणजे जीव की प्राण आहे, असे माऊली ज्ञानोबाराय सांगतात आणि समर्थ रामदाससुध्दा भगवान शंकर रामनामाचा जप करतात हे सांगताना त्यांचे शूलपाणी, पार्वतीश आणि कामाला जाळणारा असे वर्णन करतात.
नारायण नामाचा जप हेच सर्व साधनांचे सार आहे या सिध्दान्ताला वेद, श्रुती, शास्त्रे व पुराणे यातील वचन प्रमाण आहे आणि वेदशास्त्रपुराणे हेसुध्दा हरिनामाचे गायन करतात असे माऊली सांगतात व  हाच भाव समर्थ व्यक्त करतात.
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे ।
जयाचेनि योगे समाधान बाणे
तयालागि हे सर्व चांचल्य दीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे  ॥39॥
नेमके असेच वर्णन हरिपाठात माउली करतात-
वेद शास्त्र पुराण श्रुतीचे वचन ।
एक नारायण सार जप  ॥ 1 .19॥
चहू वेदी जाण षट्शास्त्री कारण ।
अठराही पुराणे हरिसी गाती ॥ 1.2 ॥  
ज्याचे भगवंताच्या नामाच्या ठिकाणी चित्त नाही, लक्ष नाही, प्रेम नाही, त्याने त्रिवेणी संगमादी नाना तीर्थयात्रा जरी केल्या तरी  त्या व्यर्थ आहेत. समर्थ हीच गोष्ट बहु हिंडता सुख मिळणार नाही असे म्हणून रामनामात आपल्या मनाला स्थिर करा असे सांगतात.
बहू हिंडता सौख्य होणार नाही ।
शिणावे परी नातुडे हीत काही
विचारे बरे अंतरा बोधवीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥41॥  
हाच भाव व्यक्त करताना माऊली हरिपाठात सांगतात -
त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी ।
चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ॥ 1.10 ॥
समर्थ मौनमुद्रा सांगतात तर माऊली मौन जपमाळ अंतरी असे सांगतात.  तसेच नामस्मरणाशिवाय अन्य पंथाला जाऊ नकोस असे सांगताना राम नसेल ते धाम सोडून द्यावे असे समर्थ सांगतात. 
मना रे जनीं मौनमुद्रा धरावी ।
कथा आदरे राघवाची करावी
नसे रामे ते धाम सोडूनि द्यावे ।
सुखालागि आरण्य सेवीत जावे ॥44॥
हाच भाव व्यक्त करताना माऊली हरिपाठात सांगतात -
नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा ।
वाया आणिका पंथा जाशी झणी ॥ 3 ॥
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी ।
धरोनी श्रीहरि जपे सदा ॥ 4.26 ॥ 
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान ।
नामपाठे मौन प्रपंचाचे ॥ 4.9 ॥  
मानवाचे लक्ष भगवंताच्या नामाकडे लागत नाही असे सांगताना समर्थ म्हणतात -
अती मूढ त्या दृढ बुध्दी असेना ।
अती काम त्या राम चित्ती वसेना
अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा ।
अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ॥64॥
हाच भाव व्यक्त करताना माऊली हरिपाठात सांगतात -
नामासी विन्मुख तो नर पापीया ।
हरिविण धावया न पावे कोणी ॥ 2.10 ॥  
पर्वताप्रमाणे पातक करणे ।
वज्रलेप होणे अभक्तांसी  ॥ 1 ॥ 
नाही ज्यासी भक्ति ते पतित अभक्त ।
हरिसी न भजत दैवहत  ॥ 2.7 ॥
रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण ।
जडजीवा तारण हरि एक  ॥ 2.21 ॥ 
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥2.1॥

समर्थ म्हणतात की, नामस्मरणाने महादोष जातात -
जयाचेनि नामे महादोष जाती ।
जयाचेनि नामे गती पाविजेती
जयाचेनि नावे घडे पुण्यठेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥71॥
तर माऊली म्हणतात की, नामस्मरणाने सर्व दोष जातात. तसेच समर्थ सकाळी रामनामाचे स्मरण करा म्हणून सांगतात तेथे माऊली हरि मुखे म्हणा असे सांगतात. याचे फळ म्हणजे आपल्याला ज्याची गणना करता येणार नाही असा पुण्यठेवा जोडला जाणार आहे याबाबत दोन्ही संतांचे एकमत आहे. त्याचप्रमाणे हरिनामाने जडजीवांचे तारण होणार आहे त्याचप्रमाणे रामनामाने उत्तम गती प्राप्त होणार आहे. म्हणजे वेगळया शब्दांत एकच अर्थ सांगितला गेला आहे.
भगवंताच्या नामस्मरणाबाबत रामदास सांगतात-
नव्हे कर्म ना धर्म ना योग काही ।
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही
म्हणे दास विश्वास नामी धरावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥76॥
हाच भाव व्यक्त करताना माऊली हरिपाठात सांगतात -
जप तप कर्म क्रिया नेम धर्म ।
सर्वाघटी राम भाव शुध्द  ॥ 1 ॥ 
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो ।
रामकृष्णी टाहो नित्य फोडी ॥ 2.24 ॥
जप, तप, कर्म, क्रिया, नेम, धर्म आदि उपासनेचे जे अनेक प्रकार आहेत त्यांचा अंतिम हेतू साधकांच्या ठिकाणी 'सर्वांघटी राम' या शुध्द भावाचा आविर्भाव होण्यासाठीच असतो. यासाठी हा भाव मनातून जाऊ देऊ नका, याचा विसर पडू देऊ नका. अंतःकरणातून सर्व प्रकारच्या संशयाला हद्दपार करा आणि शुध्द भावाचा जीवनात साक्षात्कार होण्यासाठी रामकृष्णहरी असा भगवंताच्या नावाचा टाहो फोडून नित्य धावा कर, असा उपदेश माऊली हरिपाठातून करतात. समर्थ रामदाससुध्दा अन्य सर्व मार्गांपेक्षा भगवंताच्या नामाबाबत मनात विश्वास धरावा आणि सतत रामनाचे चिंतन करावे असेच सांगतात.
समर्थ रामदास पुढे सांगतात -
महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी ।
जपे रामनामावळी नित्यकाळी
पता पापरूपी तया देखवेना ।
जनीं दैत्य तो नाम मूखे म्हणेना ॥96॥
हाच भाव व्यक्त करताना माऊली हरिपाठात सांगतात -
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला ।
उध्दवा लाधला कृष्ण दाता ॥ 5 ॥  
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ ।
सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥ 6.8 ॥  
भक्त आणि भक्ती याचे उदाहरण देताना समर्थ रामदास आणि माऊली दोघेही भक्त प्रल्हादाचे उदाहरण देतात. माऊली सांगतात - नामस्मरणामुळे अमृत तत्त्वाची प्राप्ती होते त्यामुळे लहानपणापासून अतिशय त्वरेने भक्त प्रल्हादाने भगवंताच्या नामस्मरणाची आवडी धरली. त्याचप्रमाणे उध्दवालाही भगवंताच्या कृपेने हा ठेवा लाभला. ज्याने आपला उध्दार घडून येतो ते नामस्मरण हे सुलभ असे साधन आहे, पण त्याचे महात्म्य जाणणारे दुर्लभ म्हणजे विरळाच आढळतात. प्रत्यक्ष भक्त प्रल्हादाचा पिता हा भगवन्नामस्मरणाचा विरोध करीत होता. हीच गोष्ट समर्थ आपल्या मनाच्या श्लोकातून सांगतात.
समर्थ रामदास हेच सांगतात की, ज्या मनुष्याला भगवन्नाम आवडत नाही त्याला यमराज नाना प्रकारे जाच करतो, यासाठी मनुष्याने रामनामाची आवडी धरावी आणि सतत नामाचेच स्मरण करावे.
जया नावडे नाम त्या यम जाची ।
ल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ॥
म्हणोनी अती आदरे नाम घ्यावे ।
मुखे बोलता दोष जाती स्वभावे ॥ 101॥
हाच भाव व्यक्त करताना माऊली हरिपाठात सांगतात -
हरिविण जन्म तो नर्कचि पै जाणा ।
यमाचा पाहुणा प्राणी होय ॥ 3 ॥    
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड ।
गगनाहूनि वाड नाम आहे ॥ 4 .22॥ 
 माऊली सांगतात की, हरिनामस्मरणावाचून जन्म गेला म्हणजे नरकच प्राप्त होणार. जो नामस्मरण करीत नाही असा मनुष्य यमराजाच्या घरी पाहुणचार भोगण्यास अर्थात तेथे आपले हाल करून घेण्यासाठी जाणार. त्याला शिक्षा करण्यासाठी यमराज परलोकात घेऊन जातो. यासाठी माऊली मोठया प्रेमाने आणि आस्थेने गुरुदेव निवृत्तिनाथांना नाममहिमा विचारतात तेव्हा गुरुदेव सांगतात की, नामाचा महिमा आकाशहूनही अगाध आहे.
समर्थ सांगतात - उत्तम गती मिळण्यासाठी म्हणजेच तरणोपाय होण्यासाठी सज्जनांची संगती आवश्यक आहे. कारण या संगतीने तर दुर्जनाच्या मतीतही पालट घडून येतो.
गतीकारणे संगती सज्जनाची ।
मती पालटे सूमती दुर्जनाची ॥
रतीनायिकेचा पती नष्ट आहे ।
म्हणोनी मनातीत होवोनी राहे ॥129॥
हाच भाव व्यक्त करताना माऊली हरिपाठात सांगतात -
संतांचे संगती मनोमार्ग गती ।
आकळावा श्रीपती येणे पंथे ॥ 1 .8॥
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ।
साधूचे संगती तरणोपाय ॥ 4.5 ॥
माऊली सांगतात की, संताच्या संगतीत मनोमार्गाला 'उलट गती' देणे हा श्रीपतीला प्राप्त करून घेण्याचा पंथराज आहे. समर्थ सांगतात की, मनातीत होऊन राहावे. या दोन्ही भूमिकांचा भावार्थ एकच आहे - 'मन हे रामरंगी रंगले'. जेव्हा मन रामरंगात तल्लीन होते तेव्हा ते मन उरत नाही. मनातीत अवस्था प्राप्त होते. माऊली अगदी दृष्टान्त देऊन असे सांगतात की, साधूच्या संगतीवाचून साधकाला तरणोपाय नाही.
समर्थ रामदास सांगतात की, आपण सज्जनांची संगती धरली पाहिजे कारण यामुळे भाव बळावतो, चांगली बुध्दी लाभते आणि सन्मार्ग सापडतो. याच्या बळावर आपण महाक्रूर आणि विक्राळ अशा काळालाही टक्कर देऊ शकतो. कारण साधक हरिरूप झाल्यावर त्याला काळाचे भय उरतच नाही.
धरी रे मना संगती सज्जनाची ।
जेणे वृत्ति हे पालटे दुर्जनाची ॥
बळे भाव सद्बुध्दि सन्मार्ग लागे ।
महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे ॥135॥
हाच भाव व्यक्त करताना माऊली हरिपाठात सांगतात -
साधुबोध झाला नुरोनिया ठेला ।
ठायीच मुराला अनुभवे ॥ 1 ॥       
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी ।
हरि दिसे जनी वनी आत्मतत्त्वी ॥ 4 .6॥
संतांच्या उपदेशाचा बोध ज्याला झाला तो त्या अनुभवाने आपल्या ठायीच मुरतो. त्यामुळे साधुंचे अंकित होऊन त्यांच्या उपदेशाप्रमाणे आपण वागले पाहिजे. माऊली सांगतात की, आम्हाला संतसंगतीचीच मोठी गोडी वाटते, कारण यामुळे जनी, वनी व आत्मतत्त्वी अशा प्रकारे सर्वत्र हरि भरून राहिलेला आहे असा त्याला निश्चित अनुभव आपल्याला येतो.
लोकांनी एकबाणी, एकवचनी अशा भगवान रामाचे नामस्मरण सतत करावे असे समर्थ सांगतात. तर रामकृष्णगोविंद हे नाम आपल्या वाचेने जपावे असे माऊली सांगतात. भगवंताचे नाव हेच एक मुख्य तत्त्व आहे आणि त्यामुळे तेच एक आपल्या अंतःकरणात दृढपणे धारण केले पाहिजे. मग तुझी हरिला अवश्य करुणा येईलच!
भजावा जनीं पाहता राम एकू ।
करी बाण एकू मुखी शब्द एकू
क्रिया पाहता उध्दरे सर्व लोकू ।
धरा जानकीनायकाचा विवेकू  ॥131॥
हाच भाव व्यक्त करताना माऊली हरिपाठात सांगतात -
एक तत्त्व नाम दृढ धरी मना ।
हरिसी करुणा येईल तूझी  ॥ 1 ॥ 
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद ।
वाचेसी सद्गद् जपे आधी ॥ 2.26 ॥
खरे पाहता, अशी अनेक साम्यस्थळे या दोन संतांच्या विचारांत आढळतील पण त्यासाठी दोन्ही विचारधारांचा सांगोपांग विचारधारांचा सखोल अभ्यास करावा लागेल. प्रस्तुत लेखकाने आपल्या अल्प अभ्यासाच्या आधारावर ही साम्याची तुलना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात, काही जणांना ही तुलना आवडेल अथवा आवडणारही नाही. पण डोळसपणे या साम्यस्थळांचा आनंद घेणे अधिक चांगले असे सांगावेसे वाटते.
----------------------------------------


Thursday, 10 March 2016

हरिपाठ व मनाचे श्लोक यांतील साम्यस्थळे -पूर्वार्ध

हरिपाठ व मनाचे श्लोक यांतील साम्यस्थळे
ह.भ.प. दीपक हनुमंत जेवणे (कीर्तन विशारद)
अनेकदा दोन महापुरुष वा दोन विचारवंत यांच्या विचारातील भेद आणि साम्यस्थळे दर्शविण्याचा प्रयास विचारवंत करीत असतात. यामधील दोन महापुरुष हे वेगळया संस्कृतीतून, समाजातून, विचारधारांमधून आलेले असले तर त्याला वेगळा आशय प्राप्त होत असतो. वाचकांनाही अशी तुलना आवडत असते वा पसंत पडत असते. विचारांतील भेद सामान्य वाचकांनाही प्रकर्षाने जाणवू शकतो; मात्र साम्यस्थळे पाहण्यासाठी दोन्ही महापुरुषांच्या विचारधारांचा समग्र अभ्यास आवश्यक असतो. एखादा अभ्यासक वा संशोधक अशी तुलना करू शकतो. वेगळया संस्कृतीतून आलेल्या महापुरुषांच्या विचारसरणीतील साम्यस्थळे वाचकांना विस्मित करून जातात. पण काही वेळा एकाच संस्कृतीतील महापुरुषांच्या विचारांतील साम्यस्थळे दर्शविण्याचाही प्रयास केला जातो. संस्कृती एकच असली तरी तिच्यात वेगवेगळी दर्शने आकाराला येऊ शकतात हे नाकारता येत नाही. भारतीय संस्कृतीत अशी मोठी विविधता आपल्याला आढळून येते. काही अभ्यासक अशा विविधतेत एकता शोधत असतात. मात्र एका विचारधारेच्या अनुयायांचा दुसऱ्या विचारधारेतील महापुरुषाच्या साहित्याचा पुरेसा अभ्यास नसल्यास अज्ञानातून सदर विचारधारेस वेगळे मानले जाणण्याचा धोका नाकारता येत नाही.
मात्र तुलनात्मक दृष्टीने विचार करताना 'एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति मे।' या सूत्रानुसार आध्यात्मिक ज्ञानाचे उगमस्थान कदाचित एकच असावे, असे वाटते. याच विचाराला पुढे नेऊन आपण असे म्हणू शकतो की, जर प्रारंभिक सूत्र एकच असेल तर मग त्याचे प्रकटिकरण जर वेगवेगळया व्यक्तींने वेगवेगळया काळात आणि प्रसंगात वेगळेपणाने केले असले तरीही त्यातील एकत्व मोडत नाही अथवा पुन्हा एकत्व प्रस्थापित करण्याचा प्रयास म्हणजे अकारण खटाटोप या सदरातही मोडणारा ठरू शकतो.
भारतीय संस्कृतीत वेगवेगळया उपासना पंथांनी मांडलेले तत्त्वज्ञान वरकरणी वेगळे भासत असले तरी तसे ते वेगळे नसतेच, त्यामुळे त्यातील साम्य प्रत्ययाला आल्यावर वाटणारा विस्मय अनाठायी का म्हणता येणार नाही!
या लेखाची अशी प्रस्तावना करण्याचे कारण हेच की संत ज्ञानदेवांचा हरिपाठ आणि संत रामदास यांचे मनाचे श्लोक यांच्यातील साम्यस्थळे दाखविण्याचे साहस येथे लेखकाला करायचे आहे. एका टप्प्यावर या दोन्ही महापुरुषांनी मांडलेले विचार इतके एकरूप होतात की, त्यात वेगळेपणाच भाव हा मिथ्या ठरावा!
काळाच्या ओघात सुरूवातीला या ज्ञानाचा पूर्वापार मौखिक पध्दतीने प्रसार झाला. तसा प्रकार होताना स्वाभाविकपणे व्यक्तिसापेक्ष पध्दतीने त्यात काही आणखी जोडले गेले अथवा काही वगळले गेले असावे. काही गोष्टी नव्या प्रकारे मांडण्यात आल्या असाव्यात पण गुरुशिष्य परंपरेने हे ज्ञान पुढे पुढे चालत गेले. आपल्या सनातन धर्मात परमात्मा हा निराकारच मानला गेला आहे. सगुण भक्तीच्या मिषाने त्याला विविध आकारात आणि विविध स्वरूपात कल्पिले गेले. तसेच या परमात्म्याला वेगवेगळी नावेही ठेवण्यात आली. काही नावे पुल्लिंगी तर काही नावे स्त्रिलिंगी असली तरीही हा परमात्मा निर्गुण व निराकार असल्यामुळे त्याला अमुक एक लिंग धारण करणारा असे मानता येत नाही. त्याला नर वा नारी मानता येत नाही. सगुण भक्ती करणारे पंथ तयार झाल्यानंतर त्यांची दैवतभेदाने वेगळी ओळख निर्माण झाली. पण हा परमात्मा अभेद तत्त्वानेच नटलेला आहे. त्यामुळे प्रसंगवशात् नाम वा रूप तसेच वेगळे संबोधन वापरल्याने त्याच्या तत्त्वाला कोणतीही बाधा निर्माण होत नाही. पंथ आणि संप्रदायांत वेगळी ओळख व वेगळेपणा असला तरी मूळ अध्यात्म आणि उपदेशात वेगळेपणा असू शकत नाही. वारकरीपंथात 'रामकृष्णहरी' हा मंत्रच बनला आहे आणि रामदासांनीही समर्थ संप्रदायात या तिन्ही नामांत अभेद मानून प्रसंगवशात रामनामासोबत अन्य नामांचाही वापर केलेला आहे. प्रस्तुत लेखात वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वर आणि समर्थ संप्रदायाचे संस्थापक रामदास स्वामी यांच्या उपदेशातील सारखेपणा अथवा साम्य दर्शविले आहे. खरे पाहता, या दोनच संप्रदायात हे साम्य नसून अन्य संप्रदायांतही अंतिमतः असेच साम्य आढळून येईल, असा लेखकाचा कयास आहे. प्रसंगोपात वेगळे शब्द वापरले गेले तरी त्यातून एकच भावार्थ निघतो, असे आमचे विनम्र निवेदन आहे.

माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि समर्थ रामदास स्वामी या दोन संतांच्या काळातही मोठे अंतर आहे. हे दोन्ही संत वैराग्यपूर्ण होते हे मोठे साम्य. वास्तविक पाहता, ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मसालाबाबत वाद आहे. शालिवाहन शके 1193 अथवा 1197 मध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदी येथे जन्म झाला. रामदास स्वामी यांचा जन्म शके 1530 साली जांब येथे झाला. याचा अर्थ या दोन्ही संतांच्या कार्यकाळात चारशे वर्षांहून अधिक अंतर होते. आणखी महत्त्वाचा भेद म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळी स्वराज्य होते तर रामदासांचे काळी पारतंत्र्य होते आणि याच पारतंत्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळी देवगिरीचे यादवांचे हिंदवी स्वराज्य आणि रामदासांच्या काळी शिवरायांचे हिंदवी स्वराज्य होते या साम्यतेपर्यंत आपण पोहोचू शकतो. मात्र धर्मसंस्थापनेचे कार्य दोन्ही संतांना करावे लागले. बहुजन समाजाला वेदविद्येची द्वारे उघडून देण्यासाठी ज्ञानेश्वरांनी 'भावार्थदिपिका' ही गीतेवरील टीका मराठी भाषेत लिहिली आणि समर्थांनीही मराठी भाषेत अध्यात्मविद्या आणण्यासाठी 'दासबोध' ग्रंथ लिहिला.

आणखी महत्त्वाचे साम्य सांगायचे तर, भाविकांसाठी ज्ञानेश्वरांनी विस्ताराने सोपासुलभ असा 'हरिपाठ' लिहिला तर समर्थ रामदासांनी सोपेसुलभ असे 'मनाचे श्लोक' लिहिले. एवढा काळ लोटला तरी हरिपाठाची आणि मनाच्या श्लोकांची लोकप्रियता न घटता वाढतच जात आहे. हरिपाठाचा एखादा अभंग माहीत नाही अथवा मनाच्या श्लोकांतील एकही श्लोक माहीत नाही, असा मराठी मनुष्य मिळणे दुर्लभच! केवळ तुलनात्मक दृष्टया सांगायचे तर कालानुक्रमे मनाचे श्लोक हे आपल्याला अधिक निकटच्या काळात रचले गेलेले असल्यामुळे त्यातील मराठी भाषा आपणास समजायला अधिक सुलभ वाटते. हरिपाठाची रचना त्यापेक्षा जुन्या काळात झालेली असल्यामुळे त्याचा भावार्थ प्रयत्न करून समजून घ्यावा लागतो. परंतु या विवेचनाचा असा मुळीच अर्थ होत नाही की, हरिपाठापेक्षा मनाच्या श्लोकात कमी अध्यात्म आले आहे वा मनाच्या श्लोकांपेक्षा हरिपाठात उच्च दर्जाचे अध्यात्म आले आहे. यापेक्षा, अतिशयोक्ती वाटली तरी असे म्हणायला हरकत नाही की, माऊलींनीच रामदासांच्या रूपाने पुन्हा प्रकट होऊन हरिपाठातीलच अध्यात्म अधिक सुलभ आधुनिक मराठीत मनाच्या श्लोकांच्या रूपाने मांडले आहे. या लेखात अशी समानता दर्शविणारे मनाचे श्लोक व हरिपाठाच्या अभंगातील चरण दिलेले आहेत. अभ्यासकांनी यावर अवश्य विचार करावा!
'गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा।' हा पहिला नमनपर श्लोक झाल्यावर, समर्थ रामदास मनाच्या श्लोकाचा सूत्रपात करताना दुसऱ्याच श्लोकात सांगतात -
मना सज्जना भक्तिपंथेचि जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥
हा पंथ राघवाचा आहे असे उल्लेख केल्यानंतरही समर्थ असेच सांगतात की, तो श्रीहरी आपल्याला पावायचा असेल तर आपण भक्तिमार्गानेच वाटचाल केली पाहिजे. मनाच्या श्लोकात हरिनामाची आवर्तने होतात, तर माउलींच्या हरिपाठात 'रामकृष्ण' नामाचा गौरव सतत सांगितला जातो. माउली ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात सांगतात -
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
तेणे मुक्ती चारी साधियेल्या ॥ 1 ॥ 
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥ 2 ॥  
असोनि संसारी जिव्हे वेगु करी ।
वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ॥ 3 ॥  
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे ।
द्वारकेचा राणा पांडवा घरी ॥ 4 ॥
नेमका हाच अर्थ स्पष्ट करताना समर्थ रामदास मनाच्या श्लोकात सांगतात -
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।
पुढे वैखरी राम आधी वदावा ॥ 3 ॥
न ये राम वाणी तया थोर हाणी ।
जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी ॥
हरीनाम हे वेदशास्त्री पुराणी ।
बहु आगळे बोलिली व्यासवाणी ॥ 90 ॥
मुखी नाम नाही तया मुक्ती कैची ।
अहंतागुणे यातना ते फुकाची ॥
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा ।
म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ॥ 97 ॥
देहादीक प्रपंच हा चिंतियेला ।
परी अंतरी लोभ निश्चित ठेला ॥
हरीचिंतने मुक्तिकांता वरावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ॥ 165 ॥
तसे पाहता, हरिपाठाचे 27 अभंगच सांप्रदायिक मान्यतेप्रमाणे गाइले जातात; त्याच ठिकाणी मनाच्या श्लोकांची संख्या 205 आहे. त्यामुळे माउलींच्या हरिपाठ सूत्ररूपाने आलेल्या सिध्दान्ताबाबतचीच  खुलासेवार रचना मनाच्या श्लोकात आलेली आहे व समर्थांनी आपली कल्पना अत्यंत विस्तारपूर्वक मांडलेली आहे.
या दोन्ही संतांच्या प्रतिपादनात साम्य पाहायला गेलो तर आपणास आढळते की, दोन्ही संत 'व्यास'वाणीचा दाखला देतात, वेदशास्त्रांची ग्वाहीसुध्दा देतात. माउली 'हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा' असे सांगतात तर समर्थ 'म्हणा रे म्हणा  देवराणा' असे सांगतात. नामस्मरणाने चारी मुक्ती साधल्या जातात असे माऊली सांगतात; त्याच ठिकाणी समर्थ आग्रह धरतात की, 'हरीचिंतने मुक्तिकांता वरावी ।' यावर आणखी भाष्य काय करावे?
पुढे समर्थ सांगतात -
न बोले मना राघवेवीण काही ।
जनी वाऊगे बोलता सुख नाही ॥ 23 ॥
माऊली सांगतात -
अनंत वाचाळ बरळती बरळ ।
त्या कैसा दयाळ पावेल हरि ॥ 3.7 ॥
मानवाचा जन्म हा हरिनामसंकीर्तनासाठीच झालेला असल्यामुळे भगवंताचे नामस्मरण करताना एक घडीसुध्दा फुकट जाऊ देऊ नकोस, असे पुढे समर्थ सांगतात -
मना जे घडी राघवेवीण गेली ।
जनी आपुली ते तुवा हानी केली ॥ 46 ॥
याच संदर्भात, हरिच्या नामाशिवाय संपूर्ण जग हे मिथ्या आणि मायारूप असल्यामुळेच हरिनाम घेतल्यावाचून तू अर्धघडी राहू नकोस असे माऊली सांगतात -
सर्व सुख गोडी सर्व शास्त्रे निवडी ।
रिकामा अर्धघडी राहू नको  ॥ 1 ॥ 
लटिका व्यवहार सर्व हा संसार ।
वाया येरझार हरिविण ॥ 2.27 ॥
संत तुलसीदास सुध्दा या अर्धघडीच्याही अर्ध्या भागाचे महात्म्य आपल्या दोह्यात सांगतात -
एक घडी आधी घडी आधी मेंपुनि आध ।
तुलसी संगत साधु की कटे कोटि अपराध ॥
एकूण 'हरिभजनाविण काळ घालवू नको रे' असेच या संतांना सांगायचे आहे!
हरिनामाची गोडी लागलेला हरीचा भक्त सर्वत्र एकाच हरीला पाहत असतो, हे सांगताना समर्थ म्हणतात -
मनी लोचनी श्रीहरी तोचि पाहे ।
जनी जाणता भक्त होऊनि राहे ॥ 47 ॥
तशाच प्रकारे माउली सांगतात -
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ।
भरला घनदाट हरि दिसे ॥ 4.2 ॥  
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी ।
हरि दिसे जनी वनी आत्मतत्त्वी ॥ 4.6 ॥  
समर्थ आपल्या मनाच्या श्लोकात एके ठिकाणी सांगतात-
वसे हृदयी देव तो जाण ऐसा ।
नभाचे परी व्यापकु जाण तैसा ।
सदा चंचला येत ना जात काही ।
तयावीण कोठे रिता ठाव नाही ॥ 195 ॥
आता, पाहा बरे यांच्या प्रतिपादनात किती साम्य आहे! माउली सांगतात की, भरला घनदाट हरी दिसे आणि समर्थ सांगतात की, तयाविण कोठे रिता ठाव नाही. जनी वनी आत्मतत्त्वी हरी दिसतो असे माउली सांगतात; समर्थ तेच प्रतिपादन करताना म्हणतात -
मनी लोचनी श्रीहरी तोचि पाहे ।
जनी जाणता भक्त होऊनि राहे ॥ 47 ॥
म्हणजे, पाहा पुन्हा फिरून आलोच की नाही तेथे!
समर्थ पुढे सांगतात -
समस्तामध्ये सार साचार आहे ।
कळेना तरी सर्व शोधूनी पाहे ॥
जीवा संशयो वाउगा तो त्यजावा ।
प्रभाते मनी राम चिंतित जावा ॥ 75 ॥
माऊली काय सांगतात ते पाहा बरे -
मंथुनी नवनीता तैसे घे अनंता ।
वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥ 2.2 ॥ 
त्रिगुण असार निर्गुण हे सार ।
सारासार विचार हरिपाठ ॥ 1 ॥    
सगुण निर्गुण गुणाचे अगुण ।
हरिविण मन व्यर्थ जाय  ॥ 2.3 ॥  

अहो, सार म्हणजेच नवनीत. या गुणमयी विश्वात सार असेल तो केवळ हरीच, अन्य सर्व काही असार आहे. लोणी मिळविण्यासाठी मंथन तर करावेच लागते आणि हरी मिळविण्यासाठी समर्थ विचाराने शोध घ्या म्हणतात. हे सर्व विचारमंथनच आहे की! व्यर्थ असलेला संशय सोडून द्यावा याबाबत दोन्ही संतांचे एकमत आहे. 

                                                   पूर्वार्ध समाप्त 

नमन आणि मंगलाचरण नोटेशन

नमन आणि मंगलाचरण करताना संस्कृत आणि मराठी श्लोक म्हणावे लागतात. येथे त्यांचे नोटेशन दिलेले आहे. हार्मोनियमवर ते वाजवून आपण श्लोक गायन करू शकतो.

खाली मध्यमातील म्हणजे काळी-3 या पट्टीतील श्लोकाचे वादन दिले आहे.

ओळ 1- साग  ग  गग  ग  गग  ग  रेसा  रे

       21  1   11   1   11   1  32  2

ओळ 1-  रेरे   रे सानि सा निसा ग  गरे  रे  गसा
        33  3  21  2  12  1   13  3  13
ओळ 3- मम  प  पप  प  मग  ग  रेसा  रे
        11   4  44  4  21   1  32  3
ओळ 4- रेरे  रे सानि नि सानि  J       a{J       सा
       33  3  21  1  2 1  434  2

श्लोक
अलं का पुरी पु ण्यभू मी पवि त्र
तिथे नां दतो ज्ञा नरा जा सुपा त्र
तया आ ठवि ता महा पु ण्यरा शी
नम स्का रमा झा श्रीज्ञा ने श्वरा शी


संस्कृत श्लोक

ओळ 1 - रे  गग ग गरे  ग  रे  नि  रे  नि रेरेसा  निसा
        3  44  4 43  4  3  1   3  1  332  12

ओळ 1 - उ  पदे शो हिमू र्खा णां  प्र  को पा यनशां तये


ओळ 2 - गगग पपप माप माग निरेनि रेगसा सासा    -
         333 444  14  32  131  342  22   ऽ  
    
ओळ 2 - पयःपा नंभुजं गा नां  केवलं विषव र्धनं   ऽ



आर्या-1
भूऽ जल  तेऽ ज समी ऽ र ख 
नि- निनि नि- नि नि सां-सां सा 

रविशशि काऽ ष्ठाऽऽ   दिकीऽ    असेऽ   भरलाऽ ।
पपसांसां निध पनिसां  निप-    पम-    पधप- ।

स्थिरचर व्याऽपुनि अवघाऽ तोऽ परमाऽत्माऽ दशांऽगुळेऽ उरलाऽऽऽऽ ।
ममपप  प-पध   ममगरे   ग-  पपम-प-  गग-मगरे  पमग--रेसा ।

                                                                                 आर्या-2

देऽवा पाहुऽनि हर्षेऽ प्रेमाश्रूऽ नऽऽयनिऽ आदऽरे वंदीऽ
स्तुतिरीति कऽळेनाऽ परि वाऽटेऽ व्हाऽवेचऽ विष्णुऽचा बंदीऽऽऽऽ।