Wednesday, 24 February 2016

समाजपुरुष संत एकनाथ आख्यान - भाग १


समाजपुरुष संत एकनाथ आख्यान


... दीपक महाराज जेवणे, कीर्तन विशारद

येताच नाथ, ती कावड श्रीखंडयाची
जलभरणी होते प्रतिवरसी हौदाची
या नाथ सारुनी मृदु पुष्पांची शाल
अजुनिही तप्त रणि रडते अंत्यज बाळ
अश्वत्थमुळयांचा गळा लागता फास
केलेत मुक्त तुम्ही नाथ, ज्ञानदेवास
अक्षरे तुम्हांविण कोण करिल वज्राची?
प्रिय मायबोलिचे बंधन तोडायास

खानसाहेबांनी गच्चीवरून जी पिचकारी मारली. ती नाथांच्या अंगावर जाऊन पडली.
नाथांनी खानाकडे पाहून स्मित केले व ते पुन्हा स्थानाला गंगेवर गेले.
'बम्मन, मेरा क्या बिगाडेगा.''
असेच बरेचदा घडले.

यवन पापी चांडाळ, नाथावरी थुंकी टाकी
स्नानाला परतून जाती, ही शांती ढळेना बाकी
पुन्हा तैसाची वागे, खळास लाज नाही की
हे शस्त्र क्षमेचे हाती
दुष्टाची कसली भीती
म्लेंच्छा झाली उपरति
लागतो पायी येऊन, धन्य एका जनार्दन

गावातले काजीसाब आणि पाटील नवलाने म्हणतात, ''आताच तर महाराज आंघोळ करून गेले. मग सारख्या येरझारा का मारत आहेत.''
महाराजांच्या पाठून गेले तेव्हा त्यांना सर्व प्रकार कळला. ते जाऊन खानाला म्हणतात, ''खानसाब, आप क्या कर रहे है? नाथबाबा वतनदार है.''
खान जरा सांभाळून बसला.
''वतनदार ऐसा होता है.उसमें तो कोई जोश नही है!''
''आपने गलत पहचाना, उनकी साधना चल रही है. इसलिए वे गुस्सा नहीं करते. उनका जोश आपको पता नहीं. जनार्दन महाराज पता है ना? उनके चेले है। इन्होंने बडी बडी लडाई की है।''
खान अधिक सावरून बसले.
काजी आणि पाटील सांगतात.

एके दिवशी नाथ पहाटेला । आले बुरुजाला । ऐकल आवाजाला ॥
वाटले हल्ला आज होणार ।
किल्ल्यावर यवन सैन्य येणार ।
लढाई आज मोठी होणार ॥ हो जी॥

एके दिवशी एकनाथ किल्ल्याच्या बुरुजावरून पहाटेच्या वेळी फिरत होते. सहज फिरत असतानाही त्यांची चौकस नजर दूर क्षितिजावर भिरभिरत होती. एवढयात त्यांना दूर धुळीचा लोट उडताना दिसला. नक्कीच ती घोडयांच्या टापांची धूळ होती. आज आपल्या किल्ल्यावर शत्रूचा हल्ला होणार यात शंकाच नव्हती. त्यांनी ताबडतोब किल्लेदाराला जाऊन ही गोष्ट सांगितली व ते दोघेही स्वामींकडे धावले. पण पाहतात तो काय? स्वामी समाधीत तल्लीन झालेले. नाथांनी प्रसंगावधान दाखवून किल्लेदाराला सांगितले, ''तुम्ही सैन्याला तयार करा. मी स्वामींना तयार करून पाठवितो.''

खाली गर्दी होती जमलेली । सैन्याची भली । तयारी चालली ।
आज जिंकू किल्ला देवगिरीचा ।
कैद करू जनार्दन साचा ।
नाहीतर लावू पळवून बेत अमुचा ॥ हो जी ॥

किल्ल्याच्या खाली यवनांचे सैन्य गोळा झाले होते. आज देवगिरीचा किल्ला जिंकायचा आणि जनार्दन स्वामींना कैद करायचे असा बेत ठरला होता. ते जमले नाही तर स्वामींना पळवून लावून हा किल्ला ताब्यात घ्यायचा असा त्यांचा विचार होता.
इकडे स्वामींचे सैन्य सज्ज झाले. ते स्वामींची वाट पाहत होते. त्यांना शस्त्रसज्ज झालेले स्वामीजी घोडयावर स्वार होऊन येताना दिसले. इशारा झाल्याबरोबर किल्ल्याचा दरवाजा उघडला गेला आणि 'हर हर महादेव' गर्जना करत स्वामीजींच्या मागून सर्व सैन्य बाहेर पडले. युध्दाला तोंड फुटले.

घेमार लढाई चालली । तलवारी ढाली । गर्दी उसळली ।
भाल्याभाल्यांचा ठणठणाट। खडगाखडगांचा खणखणाट ।
बंदुका फैरी झडतात ॥ हो जी॥

दोन्ही बाजूंचे वीर झुंजायला लागले. एकमेकांच्या तलवारी भिडल्या. ढालीवर वार झेलले जाऊ लागले. कुणी भाले घेऊन लढाई करू लागले. तर ठासणीच्या बंदुका ठो ठो असा आवाज करू लागल्या. स्वामीजी स्वतः नेतृत्व करीत होते. त्यामुळे मराठी वीरांचा उत्साह दुणावला होता. जणू गुलाल उधळलेले अंग घामाने भिजून जावे तसे वीर रक्ताने न्हाऊन निघाले होते. त्यांनी शत्रुसैन्याला मागे रेटत नेले आणि शेवटी शत्रूचा झेंडा पडला आणि त्यांची पळापळ सुरू झाली. हातातील हत्यारे टाकून जीवाच्या भयाने सर्व शत्रुसैन्य पळून गेले.
'हर हर महादेव' गर्जना करत सैन्य किल्ल्याकडे परतले. पाहतात तो काय? खुद्द जनार्दन स्वामी महाद्वारात त्यांच्या स्वागताला उभे होते. सैन्याचे नेतृत्व करणारे स्वामीजी पुढे झाले व त्यांनी डोक्यावरचा जिरेटोप काढला आणि जनार्दन स्वामींच्या पायावर त्यांनी डोके ठेवले. त्यांना वर उठवून जनार्दन स्वामींनी छातीशी धरले. तेव्हा सर्वांना माहीत झाले. हा तर आपला एकनाथ.
एकनाथाच्या पराक्रमाने जनार्दन स्वामी संतुष्ट झाले.
धन्य तो गुरू आणि धन्य तो शिष्य.
नाथांच्या मनात गुरुबाबत किती श्रध्दा होती पाहा-

नाम जनार्दन रूप जनार्दन ।
ध्यान जनार्दन सर्व मज ॥
माय जनार्दन बाप जनार्दन ।
जन जनार्दन सर्व मज ॥
जनार्दनाचा एका जनार्दन देखा ।
जनी म्हणे सखा जनार्दन ॥

खानाला पश्चात्ताप झाला. तो म्हणाला, ''गलती हुई. माफी मागना पडेगा.''

तो जाऊन नाथांच्या पायी पडला.
नाथांच्या काळी यवनांना एवढा माज येण्याचे कारण काय? तर सर्व हिंदुस्थानावर त्यांची सत्ता होती.
माऊलींनी जेव्हा ज्ञानेश्वरी सांगितली तेव्हा स्वराज्य होते आणि नाथांच्या काळी गुलामी होती.
आपण माऊलीचा उपदेश विसरून गेलो.
अर्जुनाचा पुरुषार्थ विसरून गेलो आणि गुलाम झालो.
नाथांना हे मान्य नव्हते.
नाथ शांतिब्रह्म होते, पण पुचाट नव्हते,डरपोक नव्हते.
त्यांची शांती शुराची शांती होती. बलवंताची शांती होती.
नाथ म्हणाले, ''उठो खानभाई.''
'हिंदू मुसलमान दोई, खुदाने पैदा किया भाई ।
तुर्ककी निष्ठा पाई, हिंदूकू पकडकर मुसलमान करो॥'
ते निधडेपणाने यवनांना जाब विचारतात,
''हिंदू करिता खुदा चुकला, त्याहूनी थोर तुमच्या अकला
हिंदूस मुसलमान केला, गुन्हा लाविला देवासी ॥''
पण दुसऱ्यांना दोष देऊन उपयोग काय? आपला समाजच अर्जुनाप्रमाणे व्यामोहात सापडला होता. तो दूर करण्यासाठी परमार्थाच्या मार्गाने नाथांनी प्रयत्न केले. त्यांनी भवानी मातेच्या माध्यमातून समाजशक्तीलाच आवाहन केले -

बया, दार उघड
दार उघड बया । तू दार उघड बया ।
दार उघड बया तू दार...
नमो निर्गुण निराकार । मूळ आदिमाया तू साकार ।
घेऊन दहा अवतार । केला दुष्टांचा संहार ॥
ओम नमो आदिमाया भगवती अनादिसिध्द मूळ प्रकृती ।
म्लेंच्छे गांजिले देवभक्ता । महिमा उच्छेदिला सर्वथा ।
न चले जपतप सर्वथा । धाव शस्त्र उगारून आता ॥
बया, दार उघड
दार उघड बया । तू दार उघड बया ।
दार उघड बया तू दार...
जयजयाजी मूळपीठेंद्रभवानी।
पांडवकुळीची कुळस्वामीनी।
अर्जुनरथी स्वार होऊनी।
वाग्दोर हाती धरोनी।
रथ फिरवसी कौतुकें। बया दार उघड॥
हाच धर्म सांभाळत पुढे महाभारत युध्दात अर्जुनाच्या हातून सर्व अधर्मी लोकांचा नाश श्रीकृष्णाने घडवून आणला.
ऐसा रणउत्सव मांडिला।
उदो उदो असा शब्द जाहला।
तेव्हा अर्जुन भक्त झडपिला।
संशयसूत्रे ते काळीं।
महाशक्ति कृष्णाबाई।
मग त्वां बोधखंडा हाती घेऊन। शिर छेदिलें भूतांचें ।
बया, दार उघड
दार उघड बया । तू दार उघड बया ।
दार उघड बया तू दार...
युध्द अपरिहार्य होते. पण ते करावे की करू नये अशा संशयाने अर्जुन पछाडला गेला.
हा संशय नाहीसा करण्यासाठी तुझी आवश्यकता आहे. भागवतधर्माची भगवद्गीता हा संशय नाहीसा करणारी आहे. समाजाला आज भगवद गीतेची गरज आहे हे नाथांनी जाणले. पण अडिचशे वर्षांपूर्वी ज्ञानोबारायांनी प्रकट केलेले तत्त्व लोकांनी मूर्खपणाने गढूळ करून ठेवले होते. त्याच्या पाठशुध्दीची गरज होती. हे कार्य नाथांनी केले.
याचा सूत्रपात माऊलीने केला.
ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया.
नामा तयाचा किंकर, त्याने केला हा विस्तार
जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत
हेच कार्याचे सूत्र नाथांनी हाती घेतले.
ज्ञानियाचा एका आणि नामयाचा तुका
भागवताच्या अकराव्या स्कंधावर टीका लिहिली हे नाथांचे स्वतंत्र कर्तृत्व आहे, पण ज्ञानेश्वरीची शुध्द प्रत आपल्याला देऊन त्यांनी जे उपकार केले आहेत ते विसरता येणार नाही.
श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात,
सांगितली मात मजलागी।
अजानवृक्षाची मुळी कंठास लागली,
येऊनी आनंदस्थळी काढ वेगी ।
एका जर्नादनी पूर्वपुण्य फळले,
श्रीगुरू भेटले ज्ञानेश्वर ॥
ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा ।
तुमचा अनुग्रहो लाधला, पावन झालो चराचरी ॥
कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा,
चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा ।
गुरुसेवेलागी जाण, शरण एका जनार्दन,
चैतन्याचे जीवन, ज्ञानोबा माझा ।

सर्व सुखाची लहरी । ज्ञानाबाई अलंकापुरी ॥

शिवपीठ हे जुनाट । ज्ञानाबाई तेथे मुकुट ।

वेदशास्त्रे देती ग्वाही । म्हणती ज्ञानाबाई आई ॥

ज्ञानाबाईचे चरणी । शरण एका जनार्दनी ॥

पूर्वरंगात ज्या कर्मयोगाचे वर्णन आले आहे तो कर्मयोग आपल्याला ज्ञानेश्वरीने दिला आहे.
सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहीन तुला ॥
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥
सासू माझी जाच करते । लवकर निर्दळी तिला ॥
जाऊ माझी फडफड बोलते । बोडकी कर ग तिला ॥
नणंदेचे कारटे किरकिर करते । खरूज होऊ दे त्याला ॥
दादाला मारून आहुती देईन । मोकळी कर गे मला ॥
एका जनार्दनी सगळेची जाऊ दे । एकटीच राहू दे मला ॥

मग नाथांनी समस्येच्या मुळाला हात घातला.
हिंदू लोक का बाटतात?
सत्ता-संपत्ती यांचा अनिवार लोभ
उच्चवर्णीयांची कनिष्ठ वर्णीयांच्या विषयी तुच्छता
अस्पृश्यता आणि सामाजिक विषमता
यामुळे लोक परधर्मात जातात.
नाथ केवळ विचारवंत नव्हते,
ऐसे संत जगी । क्रिया करून दाविती अंगी ॥
मग त्यांनी कुणाची पर्वा केली नाही. कोणाचीही भीडभार बाळगली नाही.
परिणाम काय झाला. एके दिवशी त्यांचा पोटचा मुलगा हरिपंडित येऊन उभा राहिला.
''बाबा, मला आता आज्ञा द्यावी.''
हरिपंडित आपल्या वडिलांच्या समोर उभा राहून म्हणाला.
लेखनात मग्न असलेल्या एकनाथांनी मान वर उचलून त्याच्याकडे पाहात विचारले?
''कसली आज्ञा हरि?''
''मी आपले घर सोडून माझ्या पत्नीसोबत काशीला निघालो आहे?''
''हरि, काय सांगतोस हे?''
गिरिजाबाई तेथे येत पटकन म्हणाल्या.
''हो आई. माझं आणि बाबांचं पटणार नाही. रोज वाद होण्यापेक्षा घर सोडून जाणे काय वाईट? तुला माहीत आहे ना गावातील ब्राह्मण काय म्हणतात यांच्याबद्दल?''
''अरे हरि, त्यांना तुझ्या बाबांचे मोठेपण कळत नाही.''
''बाबांचं मोठेपण? अग, ब्रह्मवृंदांनी आपल्याला अजून वाळीत टाकले नाही हेच त्यांचे मोठेपण आहे.''
''वाळीत टाकण्यासारखे काय केले आहे आपण?''
''धर्म बुडवला आहे, असे सर्व ब्राह्मण म्हणतात. गोदावरीच्या काठावर रडणारे महाराचे लेकरू यांनी कडेवर घेतले. अस्पृश्याला स्पर्श केला. एवढेच नाही तर महारवाडयात ते लेकरू नेऊन दिले.''
ते वाळवंट गोदेचे, तप्त उन रणरणते
एकाकी अंत्यज बाळ, टाहो फोडून रडते
नाथ तया उचलित, साधुमन कळवळते
महारवाडा गाठत
मातेला देऊन सुत
तो समाधान पावत
ना जातपात बंधन, धन्य एका जनार्दन
''हरि, मग त्या लेकराला त्या रणरणत्या वाळवंटात असेच तडफडत रडत ठेवणे, हा धर्म होता काय? अरे, लहान बाळांना कसली आली आहे जातपात. अरे, ती देवाघरची फुलं.''
''बाबा, लहानांना नाही तरी मोठया माणसांना असते ना जातपात? तीही तुम्ही मानत नाहीत. मला रामेश्वरशास्त्री सांगत होते की, तुम्ही आपल्या वाडयात महारांना जेवायला घातलं होतं.''
''बाळा, तू लहान होतास. तेव्हा कायं झालं ते मी सांगते तुला.'' गिरिजाबाई सांगू लागल्या.
त्या दिवशी आपल्या घरी श्राध्दाचे भोजन होते. सकाळपासून आम्ही तयारीला लागलो होतो. घरात नाना तऱ्हेची पक्वान्ने तयार करायची होती. जेव्हा स्वयंपाक झाला तेव्हा त्याचा सुगंध अगदी घराच्या खिडक्यांतून बाहेर रस्त्यावर दरवळू लागला. तुझे बाबा गच्चीवर गेले होते. त्यांनी सहजपणे खाली सडकेवर नजर टाकली तर तेथे महार जातीतील नवराबायको झाडू मारत होते.
पत्नी म्हणाली, ''अहो, किती चांगला सुगंध येतोय. ते जेवण किती गोड असेल नाही?''
''तिकडे लक्ष देऊ नको. आपल्या नशिबात असलं जेवण कुठलं?''
''अहो, आज समदे ब्राह्मण पोटभरून जेवतील मग आम्हा गरिबांनी त्याचा निदान वास तरी घेऊ नये का?''
''गप बस. कोणी ऐकलं तर आपल्याला शिक्षा होईल.''
पण नाथमहाराजांनी त्यांचं बोलणं ऐकलं होतं. ते जाऊन आपल्या पत्नीला म्हणाले, ''अगं, बाहेर झाडू मारणारे पतीपत्नी यांना आपल्याकडे भोजन करण्याची इच्छा झाली आहे. त्यांना जेवायला घालणे हे पुण्याचे काम आहे.''
''हो, पण या दोघांना जेवायला घातलं तर महारवाडयातील दुसऱ्यांना ते बरं वाटणारं नाही. त्यांना कधी असे खायला मिळणार? आपल्याकडे बराच स्वयंपाक आहे. तेव्हा त्या सर्वांना बोलावून जेवायला घातलं तर जास्त पुण्य मिळेल असे मला वाटते.''
नाथांना गिरिजाबाईंचे म्हणणे पटले. त्यांनी सर्वांना बोलावले. झाडून सर्व महारवाडा आला. नाथांच्या घरी पंगत बसली. केवळ भोजनच नव्हे तर नाथांनी सर्वांना पानसुपारीसुध्दा दिली.
ही वार्ता गावभर झाली. जेव्हा नाथ ब्रह्मवृंदाना बोलवायला गेले तेव्हा ते रागावून म्हणाले, ''नाथ, तुम्ही तर स्वतः बाटलात आता आम्हाला बाटवायला बोलावत आहात काय?''
''नाही भूदेव. ते सारे बांधव जेऊन गेल्यावर सर्व साफसफाई करून सोवळयात स्वयंपाक केला आहे.''
तेव्हा ते रागाने म्हणाले, ''नाथ, काहो तुमचे पूर्वज महार होते का? ब्राह्मणांच्या आधी महारांना जेवायला घालून तुम्ही धर्म संपूर्ण बुडवला आहे.''
तेव्हा श्रीखंडया म्हणाला, ''धनी, या सर्वांना अहंकार झालेला आहे. तेव्हा त्यांची विनवणी करणे व्यर्थ आहे. हे आपल्याकडे भोजनास येतील असे मला वाटत नाही.''
तेव्हा ब्राह्मण रागाने म्हणाले, ''अरे आमची पितरे एकवेळ स्वर्गातून तुमच्याकडे जेवायला येतील, पण आम्ही तुमच्या घरात पाय ठेवणार नाही.''
नाथ म्हणाले, ''जशी आपली इच्छा.''
भोजनाची पात्रे वाढण्यात आली. श्रीखंडया म्हणाला, ''धनी, ब्रह्मवृंदाच्या पितरांना आवाहन करा.''
नाथांनी मनापासून प्रार्थना केली.
सर्व गावकऱ्यांनी येऊन पाहिले की, नाथांच्या घरी ब्रह्मवृदांची पितरे येऊन भोजन करून गेली.
तेव्हा हरिपंडित म्हणाला, ''रामेश्वरशास्त्री म्हणाले की, हा चमत्कार श्रीखंडयाने घडविला होता. तो जादूटोणा जाणतो.''
गिरिजाबाई रागावून म्हणाल्या, ''श्रीखंडया जादूटोणा जाणतो, मग खांद्याला कावडी लावून, नदीवर धावून येरझारा मारत पाणी का रे भरतो? आपला हौद जादूने भरून का जात नाही.''
''श्रीखंडया तेसुध्दा करून दाखविल! पण मी आता एक क्षणही या घरात थांबणार नाही.''
हरिपंडित बायकोला सोबत घेऊन काशीला निघून गेला. मग नाथांनी स्वतःला लोकजागृतीच्या कार्यात झोकून दिले. 

Thursday, 18 February 2016

कीर्तनाचे नमन

कीर्तनाचे नमन 

आता सर्वांनी नमनाचे पद श्रवण करावे.
रामकृष्ण हरी जय जय राम राजाराम
गोवर्धनधर गोपालनरत गोकुलसंकटहारी
नवनीरदसम नवनीतप्रिय नवलविनोद विहारी
दुर्वासोनत दुखविमोचक दुर्जनसंगमहारी
शरणागत दीना चरणी नेई करुणादृष्टी निहारी॥

याला जोडूनच रूपाचा अभंग घ्यावाः

रूप पाहता लोचनी । सुख झाले हो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥
बहुत सुकृताचि जोडी । म्हणूनि विठ्ठली आवडी ॥
सर्व सुखाचे आगर । बापरखुमादेवीवर ॥

आता आपण सर्वांनी माझ्या पाठून भजन म्हणावेः

राम राम राम राम, सीताराम सीताराम...
पुंडलिक वरदा हरि विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय,

जय जय रघुवीर समर्थ

Monday, 15 February 2016

कीर्तन प्रारंभ

कीर्तन प्रारंभ

कीर्तनाचा प्रारंभ मंगलाचरण आणि नमनाने होतो. मात्र कीर्तनात श्रोत्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रबोधिनीने वेगळया प्रकारे  सुरुवात करण्याचा विचार मांडला आहे. कीर्तनकाराने कीर्तनास उभे राहिल्यानंतर खालील भाषण करून सर्व श्रोत्यांकडून ओंकाराचे पठण करून घ्यावे.
नमस्कार, कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी सर्व भाविकांना विनंती आहे की, सर्वांचे ध्यान कीर्तनात एकाग्र होऊन कीर्तनाचा आनंद बहुगुणित व्हावा या हेतूने आपल्याला आता बीजमंत्र ओकाराचे पठण एकूण पाच वेळा करणार आहोत. माझ्या स्वरात आपला स्वर मिसळून आपणास ओंकार म्हणायचा आहे. आपल्याला विनंती आहे की आपण सुखासनात बसून हाताने योगमुद्रा करावी. त्यानंतर आपले दोन्ही डोळे बंद करावेत. मग दीर्घश्वास घेऊन आपल्या छातीत अधिकाधिक प्राणवायू भरून घ्यावा आणि तो हळूहळू बाहेर सोडत मुखाने ओंकाराचा ध्वनी करावा. असा याचा विधी आहे.
आता मी श्रीराम असे म्हटल्यावर सर्वजण प्राणवायू भरून घेतली व माझ्याबरोबर सर्वजण एका सुरात ओंकार म्हणतील... श्रीराम!
ओंकार साधनेमुळे पावन आणि पुलकित झालेल्या वातावरणात आपण मंगलाचरण करणार आहोत.
श्री मन्महागणाधिपतये नमः।
श्री सरस्वत्यै नमः।
श्री सद्गुरुनाथ, श्रोतावक्ता, मातापिता, विठ्ठलरुक्मिणी उभयोन्नमः।
सर्वेभ्यो देवेभ्यो नमः।
सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः।
आपण माझ्यामागून श्री महागणपति, माता सरस्वती आणि गुरुदेवांचे ध्यान करण्यासाठी काही श्लोक म्हणणार आहात. हे श्लोक संस्कृत असल्यामुळे त्याचा मराठी अर्थही आपण जाणून घेऊ या!
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
हे वाकडी सोंड असलेल्या विशालकाय आणि कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या देवा गजानना, आमच्यासमोरची सर्व विघ्ने दूर करून आमचे कार्य सिध्दीस न्यावे!
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाडयापहा ॥
कुंदकळी, चंद्र आणि हिमतुषार यांच्यासारखा जिचा वर्ण आहे, जिने शुभ्र वस्त्र परिधान केलेले आहे, जिच्या हातात सुंदर वीणा आहे आणि जी पांढऱ्या कमळावर बसलेली आहे, तसेच जिला ब्रह्मा, विष्णू व महेश आणि देवगणही सर्वकाळ वंदन करतात अशी भगवती देवी सरस्वती आमच्या सर्व प्रकारच्या अज्ञानाचा नाश करो आणि आम्हा सर्वांचे रक्षण करो!
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुगुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥
गुरूदेव हेच ब्रह्मा, विष्णू व महेश्वर आहेत, तेच साक्षात परब्रह्म आहेत. त्या गुरुदेवांना मी नमस्कार करतो.
आता सर्वांनी नमनाचे पद श्रवण करावे.
रामकृष्ण हरी जय जय राम राजाराम

गोवर्धनधर गोपालनरत गोकुलसंकटहारी

नवनीरदसम नवनीतप्रिय नवलविनोद विहारी

दुर्वासोनत दुखविमोचक दुर्जनसंगमहारी

शरणागत दीना चरणी नेई करुणादृष्टी निहारी॥

याला जोडूनच रूपाचा अभंग घ्यावाः

रूप पाहता लोचनी । सुख झाले हो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥
बहुत सुकृताचि जोडी । म्हणूनि विठ्ठली आवडी ॥
सर्व सुखाचे आगर । बापरखुमादेवीवर ॥

आता आपण सर्वांनी माझ्या पाठून भजन म्हणावेः

राम राम राम राम, सीताराम सीताराम...
पुंडलिक वरदा हरि विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय,
जय जय रघुवीर समर्थ
नामगजरात लोकसहभाग आवश्यक आहे. कीर्तनाचा महिमा आणि फलश्रुती सांगितल्यावाचून श्रोते भीड सोडून भजनात सामील होणार नाही. त्यामुळे कीर्तन महिमा थोडक्यात सुरुवातील सांगणे आवश्यक आहे. यासाठी श्रोत्यांकडून टाळयांच्या गजरात नामस्मरण करून घ्यावे.
भाषणः भगवंताचे गुणगायन म्हणजे कीर्तन होय. पण त्याला संगीताची साथ लाभली ते होते... संकीर्तन आणि अखंड नामधून आळवली की ते होते नामसंकीर्तन... अत्यंत सोपे साधन...साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची! तेव्हा म्हणा सर्वांनी-
रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम
(भजनाच्या शेवटी दणदणीत जयजयकार करायला लावावा. त्यासाठी प्रोत्साहन द्यावे.)
भाषणः अहो, नामाच्या जयजयकाराने पापे थराथरा कापतात...पण त्यासाठी आवाजात जोश हवा ना! पातके कशी बरं घाबरतील? म्हणा एकदा जोर लावून... अलीकडे वय झाल्यामुळे मला नीट ऐकू येत नाही.
पंढरीनाथ महाराज की...जऽऽऽय!
भले शाब्बास! मला आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे येथे खरोखरच भाविक मंडळी आहेत हो, नाही तर कुठे कुठे तर केवळ कीर्तनकारालाच बेंबीच्या देठापासून ओरडायला लावून त्याचा अंत पाहतात... पण आपण मात्र चांगले सहकार्य दिले, त्याबद्दल धन्यवाद... असेच सहकार्य कीर्तन संपेपर्यंत लाभू द्या म्हणजे झालं!
(हे म्हटल्यानंतर वक्ता आणि श्रोते यांच्यामध्ये एक भावनिक बंध प्रस्थापित होतात व कीर्तन हा केवळ एकतर्फी संवाद राहत नाही.)



useful links 

Sada Sarvada - Marathi Shloka



Saraswati Vandana Shloka by Bharat Ratna Lata Mangeshkar

 

Morning Slokas




या नंतर कीर्तनासाठी घेतलेल्या मूळ अभंगाचे वा पदाचे गायन करावे.